बांधकाम मजुरांच्या घरांचे स्वप्न होणार स्वस्त - संभाजी पाटील निलंगेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 02:01 AM2018-11-04T02:01:57+5:302018-11-04T02:02:34+5:30
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घरासाठी दिल्या जाणाऱ्या २ लाख रुपयांच्या अनुदानात आता ५० हजार रुपयांची वाढ राज्य सरकारने केली आहे.
पुणे - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घरासाठी दिल्या जाणाऱ्या २ लाख रुपयांच्या अनुदानात आता ५० हजार रुपयांची वाढ राज्य सरकारने केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणारे अनुदान धरून बांधकाम कामगारांना घरासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक साह्य मिळू शकणार असल्याची माहिती राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शनिवारी दिली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना मिळणाºया लाभांचे वाटप करण्यासाठी कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अॅथोरिटी (क्रेडाई) पुणे मेट्रोच्या वतीने नांदेड सिटी येथे आयोजित कार्यक्रमात निलंगेकर बोलत होते. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, सचिव रणजित नाईकनवरे, दर्शना परमार, जे. पी. श्रॉफ, मिलिंद तलाठी, शैलेंद्र पोळ, विकास पानवेलकर, डॉ. डी. के. अभ्यंकर, ऊर्मिला जुल्का उपस्थित होते. निलंगेकर म्हणाले, येत्या २५ वर्षांत पायाभूत सुविधांमधील होणारी वाढ लक्षात घेता २७ लाख नोंदित आणि कुशल बांधकाम कामगारांची गरज भासणार आहे.
बांधकाम कामगार, सुरक्षारक्षकांची नोंदणी
बांधकाम कामगार आणि सुरक्षारक्षकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना कौशल्याचे धडे देण्याबरोबरच त्यांना प्रमाणपत्रही दिले जाईल. राज्यात ११ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून, नजीकच्या काळात १७ लाख कामगारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट आहे. राज्यात अंदाजे २० लाख सुरक्षा रक्षक आहेत. त्या पैकी ३६ हजार जणांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे त्यांना आरोग्य, मुलांचे शिक्षण अशा विविध योजनांचा लाभ देणे शक्य होईल. कामगार नोंदणीसाठी ४० विशेष केंद्रे स्थापन करणार असल्याचे निलंगेकर म्हणाले.