घरकुलाचे स्वप्न महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2016 01:18 AM2016-04-04T01:18:21+5:302016-04-04T01:18:21+5:30
शासनाने रेडी रेकनरच्या दरात १ एप्रिलपासून वाढ केली आहे. पुणे महापालिका क्षेत्रामध्ये रेडी रेकनरच्या दरात ६ टक्क्यांनी, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
पिंपरी : शासनाने रेडी रेकनरच्या दरात १ एप्रिलपासून वाढ केली आहे. पुणे महापालिका क्षेत्रामध्ये रेडी रेकनरच्या दरात ६ टक्क्यांनी, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्याने शहरातील सदनिका तसेच
भूखंडाचे दर वाढणार असून, सदनिका अथवा भूखंड खरेदी करणे महागडे होणार आहे.
ग्रामीण भागातील (पुणे जिल्हा) रेडी रेकनर दरामध्ये ९.३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर परिसरात ७,७९९ रुपये प्रति चौरस फूट असा रेडी रेकनरचा दर राहणार आहे. चिंचवड येथे ७,१६७ रुपये प्रति चौरस फूट दर राहील. आकुर्डी, भोसरी, निगडी, दिघी, चऱ्होली, किवळे या भागातील दर पिंपळे सौदागर आणि चिंचवडच्या तुलनेत कमी आहेत.
वाकड येथील सदनिकांचे दर सध्या ४६२० ते ७७७०, पिंपळे सौदागर ५५३० ते ८०७० रुपये प्रतिचौरस फूट असे दर आहेत. चिंचवड येथील सदनिकांचे दर ५३०९ ते ५५७५, हिंजवडीत ४८८६ ते ५१९० प्रतिचौरस फूट दर आहेत. पिंपळे सौदागर, चिंचवड आणि वाकड भागात सदनिकांचे दर शहरातील अन्य भागांच्या तुलनेत अधिक होणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत शासनाने नुकताच निर्णय जाहीर केला आहे. बांधकामे नियमित होणार असली, तरी त्यासाठी दंड आकारला जाणार आहे. रेडी रेकनरच्या दराच्या आधारे नियमितीकरणाचा दंड किती आकारला जावा, हे निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे रेडी रेकनरच्या वाढत्या दराचा फटका दंड भरून अनधिकृत बांधकामे नियमित करणाऱ्यांनाही बसणार आहे. अगोदरच शासनाच्या शास्तीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अवैध बांधकामांना तिप्पट शास्ती आकारली जात होती. शास्तीने त्रस्त झालेल्या नागरिकांना अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित होणार, या निर्णयाने दिलासा मिळाला
होता. परंतु, रेडी रेकनरच्या दरवाढीमुळे आगामी काळात अनधिकृत
बांधकामे नियमितीकरणावेळी मोठा आर्थिक भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे. (प्रतिनिधी)