एटीएम वॉचमन ते लालदिव्याचे स्वप्न
By admin | Published: November 26, 2015 01:06 AM2015-11-26T01:06:36+5:302015-11-26T01:06:36+5:30
दुष्काळ पाचवीला पूजलेला, गावात बसून आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहण्यापेक्षा पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केलेला बरा, या विचाराने हजारो विद्यार्थी पुण्यात आले..
पुणे : दुष्काळ पाचवीला पूजलेला, गावात बसून आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहण्यापेक्षा पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केलेला बरा, या विचाराने हजारो विद्यार्थी पुण्यात आले.. आई-वडिलांकडे किती दिवस पैसे मागायचे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी अभ्यासाला नोकरीची जोड देताना दिसत आहेत. त्यातील काही विद्यार्थी बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षारक्षकाची नोकरी पत्करून लालदिव्याच्या गाडीचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एटीएममधील शांततेमुळे अभ्यास अन् मिळणाऱ्या पगारामुळे अभ्यास व उदरनिर्वाह हे दोन्ही हेतू ते साध्य करत आहेत.
स्पर्धा परीक्षांचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तरुण-तरुणी हजारोंच्या संख्येने पुण्यात येतात. घरची स्थिती चांगली असणारे विद्यार्थी शहरातील नामांकित अभ्यासिकांमध्ये प्रवेश घेतात. लाखभर रुपये देऊन विविध विषयांच्या शिकविण्या लावतात. मात्र, आर्थिक स्थिती हलाखीची असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी पालिकाच्या किंवा स्वयंसेवी संस्थांच्या अभ्यासिका निवडलेल्या आहेत. उदरनिर्वाहासाठी घरच्यांकडून पैसे मागण्यापेक्षा मिळेल ते काम करून ध्येय गाठण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. काही विद्यार्थ्यांनी उदरनिर्वाहासाठी विविध बँकांच्या एटीएममध्ये नोकरी निवडली आहे. एमटीएममध्ये अभ्यासासाठी पूरक वातावरण असल्याने दुसरे कोणतेही काम करण्यापेक्षा नाइलाजास्तव विद्यार्थी एटीएमच्या सुरक्षारक्षकाची नोकरी करणे पसंत करत आहेत.
एसटीने येतात जेवणाचे डबे
आपला मुलगा पुण्याला शिकायला गेला. अभ्यास करून तो मोठा साहेब होईल. घरून पैसे पाठविता येत नाही. खासगी खानावळ परवडणारी नाही. त्यामुळे आपल्या मुलाच्या खाण्याची आबाळ होऊ नये, या काळजी पोटी अनेक माता पुण्यापासून जवळ असलेल्या गावांहून येणाऱ्या एसटीच्या बसमधून मुलांसाठी दोन वेळचा डबा पाठवत आहेत. काही विद्यार्थी दररोज सकाळी स्वारगेट बस स्थानकावर जाऊन घरच्यांनी पाठविलेला डबा दुपारी व रात्री खाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत.
मूळचा जळगावचा असून, गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे. आईवडील शेती करतात. पाऊस नसल्याने फारसे उत्पन्न नाही. घरच्यांकडूनही पैसे मागता येत नाहीत. त्यामुळे मी एटीएम सुरक्षा- रक्षकाची नोकरी स्वीकारली. सुमारे सहा महिन्यांपासून नोकरी करत आहे. त्यातून साडेचार हजार रुपये मिळतात. त्यातून महिनाभराचा खर्च भागवत, मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो.
- चंद्रकांत भारूडे, विद्यार्थी
मी चांदवड येथून दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलो. एमटीएम सुरक्षारक्षकाची नोकरी माझ्यासाठी केवळ उदरनिर्वाहाचे साधन नाही. दिवसा अभ्यासिकेत अभ्यास करून, रात्री ११ ते सकाळी सात वाजेपर्यंत एटीएममध्ये अभ्यास करता येतो. त्यामुळे मी सुरक्षारक्षकाची नोकरी स्वीकारली.
- रामनाथ कुंभारडे, विद्यार्थी