सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न २८ वर्षांनी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 02:20 AM2019-03-10T02:20:39+5:302019-03-10T02:21:48+5:30

सोशल मीडियावरही कालपासून आभाराच्या पोस्ट झळकू लागल्या आहेत.

Dreams of commoners' homes fulfilled 28 years later | सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न २८ वर्षांनी पूर्ण

सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न २८ वर्षांनी पूर्ण

Next

शिरूर : २८ वर्षांनी घरे नावावर झाल्याने येथील हुडकोवासीयांनी यासाठी झटणाऱ्या सर्वांचे आभार मानले. सोशल मीडियावरही कालपासून आभाराच्या पोस्ट झळकू लागल्या आहेत.

१९९२मध्ये हुडकोवासीयांना घरे ताब्यात मिळाली. या घरांसाठी प्रतिमाह साडेतीनशे रुपयांचा हप्ता होता. २००४ मध्ये हप्ते पूर्ण झाले. त्यानंतरही घरे नावावर होण्यास १४ वर्षे वाट पाहावी लागली. या वसाहतीतील १२७ लोकांनी सुरुवातीच्या काळात दुसऱ्यांना घरे विकली होती. यांपैकी अनेक घरांचे तीन ते पाच घरमालक बदलले. घरांची विक्री झाली; मात्र ती ना मूळ लाभार्थ्याच्या नावावर होती, ना नव्याने विकत घेतलेल्या लाभार्थ्याच्या. २८ वर्षे सर्व जण घरे नावावर होण्याच्या प्रतीक्षेत होते. हुडको वसाहतीसाठीच्या जागेचे ५८ लाख रुपयांचे मूल्य २०१४मध्ये शासनाकडे जमा करूनही हुडकोवासीयांची प्रतीक्षा संपली नव्हती. नगर परिषदेने आवश्यक ती सर्व यंत्रणा राबवून पाठपुरावा सुरू ठेवला होता.

घरे लवकरात लवकर नावावार व्हावीत, यासाठी हुडकोतील नागरिकांनी हुडको संघर्ष कृती समितीची स्थापना केली होती. या समितीने आंदोलनही केले होते. एक एप्रिल रोजी आमदार बाबूराव पाचर्णे, सभागृह नेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत हुडकोवासीयांसमवेत बैठक पार पडली. या वेळी शासनस्तरावर हुडकोच्या प्रकरणाच्या स्थितीबाबत व तांत्रिक अडचणीबाबत आमदार पाचर्णे यांनी सविस्तर माहिती देऊन लवकरात लवकर घरे नावावर करण्याचे आश्वासन दिले होते. धारिवाल यांनीही सर्वांना याबाबत आश्वस्त केले होते.

यानंतरच्या काळात नगर परिषदेने आमदार पाचर्णे यांच्याशी समन्वय ठेवून पाठपुरावा सुरू ठेवला. जून (२०१८) महिन्यात पुणे येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या गृहनिर्माण, महसूल, नगर नियोजन विभागाच्या एकत्रित संयुक्त बैठकीत जिल्हाधिकाºयांनी हुडकोचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. यानंतर आमदार पाचर्णे यांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांना आश्वासनाबाबत आठवणही करून दिली.

मागील आठवड्यात त्यांनी याबाबत पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्याधिकारी अ‍ॅलिस पोरे यांनीही मंत्रालय प्रशासन स्तरावर चांगले प्रयत्न केले. अशोक पवार आमदार असताना त्यांचेही यााकामी सहकार्य लाभले आणि अखेर ८ मार्चला हुडकोवासीयांच्या नावावर घरे करण्याचा अध्यादेश पारित झाला. घरे नावावर झाल्याने यासाठी झटलेल्या आमदार पाचर्णे, सभागृह नेते धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, नगरसेविका उज्ज्वला वारे, रोहिणी बनकर, संदीप गायकवाड, माजी नगराध्यक्षा अलका सरोदे, रवींद्र ढोबळे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, अशोक पवार यांचे आभार मानले.

हुडकोवासीयांना अवघ्या ३० हजार रुपयांत घरे मिळाली. यामुळे सर्वसामान्यांचे स्वत:चे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकले. तत्कालीन नगराध्यक्ष शहीदखान पठाण, रसिकलाल धारिवाल यांचेही वसाहत उभी राहण्यात मोठे योगदान होते.ं

Web Title: Dreams of commoners' homes fulfilled 28 years later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.