दारू सोडा, दूध प्या!
By admin | Published: December 30, 2016 04:34 AM2016-12-30T04:34:23+5:302016-12-30T04:34:23+5:30
३१ डिसेंबर म्हटले, की सेलिब्रेशन, जल्लोष असेच काहीसे समीकरण पाहावयास मिळते. मात्र तरुणवर्गासाठी शिरूर पोलिसांनी ‘दारू सोडा, दूध प्या’ असा अनोखा उपक्रम यादिवशी
शिरूर : ३१ डिसेंबर म्हटले, की सेलिब्रेशन, जल्लोष असेच काहीसे समीकरण पाहावयास मिळते. मात्र तरुणवर्गासाठी शिरूर पोलिसांनी ‘दारू सोडा, दूध प्या’ असा अनोखा उपक्रम यादिवशी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मद्यपान, चंगळवाद करुन पाश्चात्त्य संस्कृती जोपासण्यापेक्षा भारतीय संस्कृती जोपासा व ३१ डिसेंबरच्या या अनोख्या उपक्रमाला प्रतिसाद द्या, असे आवाहन पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तरुणाईला केले आहे.
३१ डिसेंबर विविध पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे. यात खऱ्याअर्थाने सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षासाठी विविध चांगले संकल्प करणे अपेक्षित असते. अलीकडच्या काही वर्षात मात्र ३१ डिसेंबर साजरा करण्याची व्याख्या बदलत चालल्याचे चित्र आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा या तरुणाईवर बसू लागला आहे. यातून तरुणवर्ग बहकू लागला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ.जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गावडे यांच्या कल्पनेतून निकोप समाजवाढीसाठी ‘दारू सोडा, दूध प्या’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गावडे म्हणाले ३१ डिसेंबरच्या रात्री अनेक तरुण, तरुणी, नागरिक आनंद साजरा करण्याच्या नावाखाली मद्यपान करतात. यातून बेभान बाईक चालविणे, कल्ला करणे असे प्रकार पाहावयास मिळतात. याचा समाजाला त्रास सहन करावा लागतो. म्हणून ३१ डिसेंबरला शिरूर पोलिसांच्या वतीने संध्याकाळी ७ ते रात्री ११ या वेळात एसटी बस स्थानकाजवळ ‘दारू सोडा, दूध प्या’ या उपक्रमांतर्गत तरुणांना दुधाचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाला तरुणांनी प्रतिसाद द्यावा व निकोप समाजवाढीसाठी हातभार लावावा, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.