दारू प्या; बाटली टेबलाखाली ठेवा, पोलिसांचाही सहभाग, हायवेजवळ ढाबा-हॉटेलवर दारू विक्री जाेरात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 12:56 PM2024-05-26T12:56:05+5:302024-05-26T12:56:23+5:30
पाेलिसांच्या वरदहस्तामुळेच या हॉटेलमध्ये बिनधास्तपणे दारू पिण्यास परवानगी दिली जाते, अशी खासगीत चर्चा सुरु
पुणे : दारू प्या; पण बाटली टेबलाखाली ठेवा, काचेचा ग्लास घेऊ नका, स्टीलच्या ग्लासचा वापर करा. आणि हो टेबल चार्ज द्या. शहर आणि उपनगरातील अनेक हॉटेलमध्ये हेच चित्र आहे. मद्यविक्रीचा कुठलाही परवाना नसताना महामार्गालगतच्या ढाब्यांवर, हॉटेलवर सर्रासपणे दारू विक्री होत आहे.
कुठलाही परवाना नसताना अनधिकृतरित्या सुरू असलेल्या या प्रकाराला पोलिसांचे अभय असल्याचीच चर्चा आहे. त्याशिवाय हॉटेलमालक हे धाडस दाखवणार नाहीत, असेही बाेलले जात आहे. रेस्टॅारंटमध्ये मद्यप्राशन करणे महागडे ठरते. त्या तुलनेत वाइनशॉपमधून दारू घेऊन अशा हॉटेलमध्ये केवळ टेबल चार्ज, तोही ३०-५० रुपये दिल्यास दोनशे-तीनशे रुपये वाचतात. याच हॉटेलमध्ये जेवण केले तर टेबल चार्जही द्यावा लागत नाही. अशा हॉटेलमधून नजीकच्या पोलिस चौकींना जेवणही जात असल्याचे बोलले जाते. काही ठिकाणी कर्तव्यदक्ष पोलिस प्रत्यक्ष हजेरी लावून मनसोक्त मेजवानीचा आस्वाद तोही विनामोबदला घेतात. पाेलिसांच्या वरदहस्तामुळेच या हॉटेलमध्ये बिनधास्तपणे दारू पिण्यास परवानगी दिली जाते, अशी खासगीत चर्चा केली जात आहे.
दरम्यान, अनेकदा येथे मद्यपींकडून होणाऱ्या भांडणांचा तसेच गोंधळाचा, त्यांच्याकडून रस्त्यांवर बेशिस्तपणे लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. महामार्गावरील काही हॉटेलमध्ये ड्राय-डेलाही दारू पुरविण्याची सेवा दिली जाते. मूळ किमतीच्या अधिकचे दोन-तीनशे रुपये देऊन मद्यपींना ही सेवा मिळते. हीच अवस्था उपनगरांमधील काही झोपडपट्टी भागातही मिळत असून, खुलेआम येथे ड्राय-डेच्या दिवशी दारूची विक्री होते. पण हे पोलिस यंत्रणेला दिसत नाही का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.