जास्तीचे पाणी पिणेदेखील आरोग्याला अपायकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:22+5:302021-09-23T04:12:22+5:30
डमी १२१० पुणे : दररोज सकाळी तांब्याभर पाणी पिले तर आरोग्याला छान असते. भरपूर पाणी पिण्याच्या नावाखाली तहान नाही ...
डमी १२१०
पुणे : दररोज सकाळी तांब्याभर पाणी पिले तर आरोग्याला छान असते. भरपूर पाणी पिण्याच्या नावाखाली तहान नाही लागली तरी पाणी पिले जाते. दररोज तीन लिटर पाणी पिलेच पाहिजे का? असे अनेक गैरसमज पसरलेले असून, त्यामुळे नेमके किती पाणी प्यावे याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. तहान लागली की पाणी प्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
सकाळी उठल्यावर अनेकजण पोट साफ व्हावे, म्हणून भरपूर पाणी पितात. खरंतर सकाळी आपोआप पोट साफ होणे हे जास्त योग्य असते. जे आदल्या दिवशी घेतलेला आहार, पाणी व व्यायाम या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. जेव्हा सकाळी सकाळी आपण तांब्याभर पाणी पितो तेव्हा पाण्याच्या दबावाने आतड्यांची हालचाल सुरू होते व पोट साफ व्हायला मदत होते. पाणी गरम असेल तर पोट आणखी लवकर साफ होते. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलो तर अन्न पचनासाठी जास्त वेळ लागेल. अन्न पचनासाठी आवश्यक असलेला अग्नि हा मंद होईल. म्हणून जेवल्यानंतर भरपूर पाणी पिऊ नये. पोटाचे चार भाग करून आपणच दोन भाग अन्न, एक भाग पाणी व एक भाग हवेसाठी मोकळा ठेवावा तरच तुमचे अन्नपचन नीट होईल, असे आयुर्वेद तज्ज्ञ मनोज भांगडे यांनी सांगितले.
———————————————
पाण्याची शरीराला का असते गरज?
- शरीराचे तापमान नियंत्रित करणे.
- सांध्यामध्ये घर्षण कमी करणे.
- मेंदूचे पोषण करणे.
- रोज शरीरातून पाणी मल, मूत्र, घाम व श्वासाद्वारे शरीराबाहेर पडते. तेव्हा ही तूट भरून काढणे
———————-
गरजेपेक्षा कमी प्यायलो तर काय होईल?
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर सर्वात प्रथम मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. डिहायड्रेशन होते. आपण पाणी कमी प्यायलो तर लघवीचा रंग पिवळसर होतो. त्यामुळे अशी लघवी झाल्यास पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
- शरीराची काम करण्याची शक्ती कमी होते.
- मानसिक शक्ती कमी होते अन् निरुत्साही वाटते.
- त्वचा कोरडी पडायला लागते, रक्तदाब कमी होतो.
————————————————
प्रत्येकाची पाणी पिण्याची गरज वेगळी असते. तहान लागली तरच पाणी प्यायले पाहिजे. एखाद्याला हृदयाचा त्रास असेल तर अधिक पाणी पिल्याने हृदयावर खूप ताण येईल. जर कोणाला लघवीला अडचण येत असेल आणि त्याने अधिक पाणी प्यायले तर ते तुंबून त्रास वाढेल. एखाद्याला मूतखडा नेहमी होत असेल तर त्याला अधिक पाणी प्यायला सांगितले जाते. पण, सरसकट सर्वांनी खूप पाणी पिऊ नये. भूक लागल्यावर पाणी पितो अगदी तसेच तहान लागली की पाणी प्यावे.
- डाॅ. शिरीष भावे, यूरोलाॅजिस्ट
—————————————————