पालिकेच्या बांधकामाला पिण्याचे पाणी
By admin | Published: March 16, 2016 08:39 AM2016-03-16T08:39:18+5:302016-03-16T08:39:18+5:30
शहरामध्ये बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई असताना महापालिका मुख्य इमारतीच्या बांधकामासाठीच पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचा
पुणे : शहरामध्ये बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई असताना महापालिका मुख्य इमारतीच्या बांधकामासाठीच पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळात महापालिकेकडूनच पाण्याची मोठी नासाडी केली जात असताना ते शहरातील इतर बांधकामांवरील पाण्याच्या गैरवापरावर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा झाल्याने १ सप्टेंबरपासून शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्या वेळी पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकाम, वॉशिंग सेंटरसाठी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी वापरणे, पाण्याच्या टाक्या भरून वाहणे अशा प्रकारे पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली असून त्यांनी गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून लाखो रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
महापालिका मुख्य इमारतीच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी उघडपणे नळाला पाइप जोडून त्यातून पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरले जात आहे. महापालिकेकडूनच पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी केला जात असल्याचे उजेडात आल्याने पालिका प्रशासन पाणीटंचाईबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धरणातील पाण्याचा साठा वेगाने कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या १५ जुलै २०१६ पर्यंत उपलब्ध पाणी पुरविण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी ऋषिकेश बालगुडे यांनी याबाबत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
मुख्य इमारतीबरोबर शहरामध्ये उभारण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वापरले जात आहे. महापालिकेच्या हेल्पलाइनवर येणाऱ्या पाण्याच्या गैरवापराच्या तक्रारींनुसार कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. मात्र पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी आयुक्तांनी नेमलेली भरारी पथके केवळ नावालाच उरली आहेत.
पाालिकेवर कारवाई केव्हा?
महापालिकेकडून वॉशिंग सेंटर, सोसायट्या, वस्त्या इथे पाण्याचा गैरवापर करण्याच्या तक्रारी हेल्पलाइनवर आल्यानंतर त्यानुसार शहानिशा करून लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. महापालिकेच्या इमारतीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर सुरू असल्याची लेखी तक्रार येऊनही त्याविरुद्ध अद्याप काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.
रस्त्यांचे काम बंद ठेवा
शहरामध्ये सध्या ठिकठिकाणी चांगले डांबरी रस्ते खोदून सिमेंटचे रस्ते बांधले जात आहेत. सिमेंटच्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते, त्यामुळे ऐन पाणीटंचाईच्या काळात लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पावसाळ््यापर्यंत सिमेंटच्या रस्त्याचे काम बंद ठेवावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.
पालिकेच्या भरारी पथकांचे अस्तित्व केवळ नावालाच
शहरामध्ये एक दिवसाआड पाणीकपात लागू करण्यात आल्यानंतर पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार यांनी भरारी पथकांची स्थापना केली होती. मात्र या भरारी पथकांचे अस्तित्व केवळ नावालाच उरले आहे. महापालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावरून येणाऱ्या तक्रारींनंतर केवळ दंडात्मक कारवाई केली जात आहे. पाण्याचा गैरवापर होत असल्यास ०२०- २५५०१३८३/२५५०१३८६ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून नागरिकांना तक्रार नोंदविता येते.
महापालिकेच्या विस्तारित इमारतीसाठी खोदकाम केल्यानंतर जिवंत झरा लागला आहे, त्या झऱ्याचे पाणी इमारतीच्या बांधकामासाठी वापरले जात आहे.
-व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख