बस, रेल्वेस्थानकावर दर महिन्याला होते पिण्याच्या पाण्याची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:20 PM2022-09-20T12:20:38+5:302022-09-20T12:21:34+5:30
पाणी तपासण्याची जबाबदारी कोणाची?...
पुणे : शहरातील बसस्थानक आणि रेल्वेस्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असते. एकेकाळी अशा सार्वजनिक ठिकाणांवरील पिण्याच्या पाण्याकडे कोणाचेही लक्ष नसायचे. पाणी ज्या टाक्यांमध्ये साठवले जाते, त्याची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता तपासलेली नसल्याने पावसाळ्यात हे पाणी पिल्याने साथीचे आजार वाढायचे, पण गेल्या काही वर्षांपासून नियमित अशा ठिकाणच्या पाण्याची तपासणी आणि टाक्यांची स्वच्छता राखली जात असल्याने अशाप्रकारे आजार पसरण्याचा धोका कमी झाला आहे.
शहरात वाढायचे साथीचे आजार...
कुठलेही पाणी पिल्याने विशेषत: पावसाळ्यात अशा ठिकाणी पाणी पिणे धोक्याचे मानले जायचे, पण आज काळासोबत या गोष्टींमध्येदेखील बदल झाला आहे. शहरात साथीचे आजार वाढले की, पाणी तपासा, पाणी ज्याठिकाणी साठवले जाते तिथे स्वच्छता ठेवा अशाप्रकारे जनजागृती केली जायची; पण आता कोरोनानंतर या सगळ्या बाबींकडे कटाक्षाने बघितले जात आहे.
पैसे देऊन मिनरल वॉटर..
पुण्यातील रेल्वेस्थानक अथवा बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वॉटर प्युरिफायरद्वारे केल्याचे दिसून येते. त्यातच नव्याने आलेल्या वेंडिंग मशीनमुळे १ ते ३ रुपयात १ लीटर फिल्टर पाणी मिळण्याची सोयदेखील झाली असल्याने प्रवासी याचा फायदा घेत आहेत.
पाणी तपासण्याची जबाबदारी कोणाची?
पाणी तपासण्याची जबाबदारी संबंधित ठिकाणावरील प्रशासनाची असते. रेल्वेस्थानकावर अथवा बसस्थानकावर जे पाणी नळाद्वारे पिण्यास मिळते ते शहरात मनपातर्फे जो पाणीपुरवठा केला जातो तेथूनच येते, पण पाणी ज्याठिकाणी साठवले जाते, ते तपासून तेथील स्वच्छता राखण्याचे काम रेल्वे आणि एसटी प्रशासनाचे आहे.
आम्ही १ रुपयात पाणी घेतो
शक्यतो आज सगळ्या ठिकाणी थंडगार पाणी १ रुपयात आपल्या पाण्याच्या बाटलीत भरून मिळत आहे. त्यामुळे मी दरवेळी तेच पाणी पितो. अगदी ज्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तिथे १० रुपयात पाण्याची बाटली विकत घेतो.
- बाळासाहेब शेटे
आमच्याकडे दर महिन्याला पाण्याची तपासणी केली जाते. यासह पाणी ज्या टाक्यांमध्ये साठवले जाते त्यादेखील दर महिन्याला स्वच्छ केल्या जातात. याकडे आमचे कटाक्षाने लक्ष असते. प्रवाशांना आमच्या स्थानकावरील पाणी पिऊन काही होता कामा नये यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे विभाग.