रस्त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2016 01:49 AM2016-01-22T01:49:33+5:302016-01-22T01:49:33+5:30
सुभाषनगरमध्ये सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळात या रस्त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात
पुणे : सुभाषनगरमध्ये सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळात या रस्त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. बांधकाम, वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असे आदेश असतानाही महापालिकेच्या रस्त्यांच्या कामासाठी पिण्याच्या वापर केला जात आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्याने धरणांमध्ये खूप कमी पाणीसाठा झाला आहे. यापार्श्वभूमीवर उपलब्ध असलेले पाणी १५ जुलै २०१६ अखेर पर्यंत पुरविण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे उभे टाकले आहे. यादृष्टीने पाण्याचा गैरवापर रोखण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सुभाष नगर येथे सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविण्याचे काम पथ विभागाकडून ९ डिसेंबर २०१५ पासून हाती घेण्यात आले आहे. मार्च २०१६ मध्ये हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. सोसायटयांमधील नळ कनेक्शनचे पिण्याचे पाणी घेऊन ते रस्त्यावर फवारले जात आहे. याप्रकरणी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ऋषी बालगुडे यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार नोंदविली आहे.
धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने शहराच्या पाण्यात आणखी कपात करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे टंचाईचा सामना करावा लागू नये यादृष्टिने आतापासून खबरदारी घेणे आवश्यक आहे.