वीसगाव खोऱ्यातील गावांत धोमचे पाणी पोहोचेना
By admin | Published: May 12, 2017 04:43 AM2017-05-12T04:43:07+5:302017-05-12T04:43:07+5:30
भोरच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात सोळा गावांचा समावेश होतो. या गावांच्या माथ्यावर धोम (ता़ वाई) धरण असून, याचे पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरे : भोरच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात सोळा गावांचा समावेश होतो. या गावांच्या माथ्यावर धोम (ता़ वाई) धरण असून, याचे पाणी वीसगाव खोऱ्याला मिळण्यासाठी धोम-बलकवडी डावा कालवा पाच वर्षांपूर्वी डोंगर पोखरून काढण्यात आला़ मात्र, या पाण्याचा उपयोग वीसगावच्या पश्चिमेकडील गावांना होत असून, वीसगावाना पाणी असूनही ते मिळत नसल्याने ‘पाणी उशाला अन् कोरड घशाला’ अशी झाली आहे़
धोम-बलकवडी डावा कालवा आंबवडे खोऱ्यातील चिखलगाव व कर्नावड गावच्या शेजारील दोन डोंगर फोडून वीसगाव खोऱ्यातून पश्चिमेकडे नेलेला आहे़
या पाण्याचा येथील शेतकऱ्यांना पाणी परवाना मिळाला नसल्याने उपयोग होत नाही़ या कालव्याला गोकवडी येथील उंबरीची ओव्होळ येथे मोठ्या प्रामाणावर गळती आसल्याने कालव्या खालील अनेक शेतकऱ्यांची दहा ते पंधरा एकर शेती नापीक झाली आहे़ हा कालवा पाले, पळसोशी, वरवडी, आंबाडे, नेरे, बालवडी या गावांशेजारून गेला आसला, तरी बारामाही या गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ यातील काही गावांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे़
धोम-बलकवडी धरणाचे आवर्तन सोडले तरी ही गावे उंचवट्यावर असल्याने पिण्याचे पाणी मिळत नाही़ या उन्हाळ्याच्या दिवसात या गावांची अतिशय गंभीर स्थितीती असून, पाण्यासाठी महिलांना, नागरिकांना दूरपर्यंत पायपीट करावी लागते.
कालव्या खालील गावांना तुरळक प्रमाणात पाणी मिळत असते़ या परिसरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी वीसगाव खोरे पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे़