पक्ष्यांसह पक्षकारांसाठी न्यायालयात पिण्याच्या पाण्याची सोय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:10+5:302021-04-02T04:11:10+5:30
पिंपरी : न्यायालयात येणारे पक्षकार आणि आवारातील पक्ष्यांचा उन्हाळा सुसह्य होणार आहे. केवळ पक्षकारांसाठीच नव्हे, तर पक्ष्यांसाठीही पाण्याची सोय ...
पिंपरी : न्यायालयात येणारे पक्षकार आणि आवारातील पक्ष्यांचा उन्हाळा सुसह्य होणार आहे. केवळ पक्षकारांसाठीच नव्हे, तर पक्ष्यांसाठीही पाण्याची सोय करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत.
राज्यात उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील उन्हाचा पारा चाळिशीच्या पुढे गेला असून, पश्चिम महाराष्ट्रातील तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. त्या पार्श्वभूमीवर महाप्रबंधकांनी हा आदेश काढला आहे. राज्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायाधीशांना न्यायालयाच्या आवारात पक्षी आणि पक्षकारांसाठी पाण्याची सोय करण्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार सर्व तालुका, जिल्हा, सत्र न्यायालय, धर्मादाय आयुक्त कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यात उन्हाचा प्रकोप वाढत असून, अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. माणसांबरोबरच पक्ष्यांनाही त्याचा त्रास होत आहे. न्यायालयात पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. पाणी वेळोवेळी भरावे. पाण्याचे भांडे सावली करून ठेवावे. पक्षकारांसाठी पाण्याची व्यवस्था नसल्यास पाणपोई उभारावी. पाणपोई स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. या बाबतचा कार्य अहवाल पंधरा दिवसांत पाठवावा, असे आदेशात म्हटले आहे.
पुण्याचे धर्मादाय उपयुक्त नवनाथ जगताप म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व न्यायालयांमध्ये पक्षी आणि पक्षकारांसाठी पाण्याची सोय करावी लागेल. अनेक कार्यालयात माणसांसाठी पाण्याची सोय आहे. पक्षांसाठी करावी लाभेल, आम्ही त्याचे नियोजन केले आहे.