‘दृश्यम’स्टाईल मर्डर प्लॅन ; तब्बल दोन हजार सीसीटीव्हींच्या फुटेजवरून तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 08:27 PM2021-02-23T20:27:34+5:302021-02-23T20:28:23+5:30
व्यावसायिक आनंद उनावणे हत्या प्रकरण; कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्याने कट रचून अपहरणानंतर केला खून
पिंपरी : फ्रेंडस फंड इंडिया प्रा. लि. चिटफंड कंपनीचे संचालक आनंद साहेबराव उनावणे (वय ४२, रा. मोरवाडी, पिंपरी) यांचे अपहरण करून खून करण्यात आला. याप्रकरणी चार मुख्य आरोपींसह सात आरोपींना अटक केली. पिंपरी-चिंचवडपोलिसांनी दोन हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी करून याप्रकरणाचा तपास केला. मयत उनावणे यांनी त्यांच्या कंपनीतून कामावरून काढलेल्या एका कर्मचाऱ्याने हा प्रकार केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंदी चित्रपट ‘दृष्यम’ स्टाईलने एक वर्षापासून कट रचून चार जणांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे.
उमेश सुधीर मोरे (वय २८, रा. काळेवाडी), दीपक धर्मवीर चंडालिया (वय ३४, रा. रावेत), सागर दत्तात्रय पतंगे (वय २८, रा. कटफळ, ता. बारामती), बाबू उर्फ तुळशीराम नथुराम पोकळे अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. आरोपींनी खंडणीपोटी घेतलेले सोन्याचे दागिने कोणत्याही पावतीशिवाय खरेदी केल्याप्रकरणी राकेश राजकुमार हेमणानी (वय २७, रा. पिंपरी), कपिल ग्यानचंद हासवाणी (वय ३०, रा. पिंपळे सौदागर), प्रवीण नवनाथ सोनवणे (वय २२, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रभू पुजारी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत विष्णू साहेबराव उनावणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रभू पुजारी हा उनावणे यांच्या चिटफंड कंपनीत काम करत होता. त्याच्या वर्तणुकीवरून उनावणे यांनी त्याला वर्षभरापूर्वी कामावरून काढले. त्याचा राग धरून त्याने उनावणे यांना मारण्याचा तसेच त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्याने अन्य चार आरोपींना विश्वासात घेऊन एक वर्षापासून कट रचला. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री उनावणे यांच्या राहत्या घरापासून आरोपींनी चारचाकी वाहनातून अपहरण केले. त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर आरोपींनी उनावणे यांचा दोरीने गळा आवळून खून केला. महाड येथे दगडाने ठेचून मृतदेह सावित्री नदीपात्रात फेकून दिला. उनावणे यांचा मृतदेह ६ फेब्रुवारी रोजी नदीपात्रात आढळला. आरोपींना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम, दागिने असा एकूण ३९ लाख ५ हजार ६७८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
यापूर्वीही चारचाकीतून केले होते अपहरण
आरोपी उमेश, दीपक, सागर आणि बाबू या आरोपींनी ऑक्टोबर महिन्यात एक अपहरण आणि खंडणीचा गुन्हा केला होता. त्या गुन्ह्यात ते आरोपी बाहेर आले. त्यानंतर मुख्य आरोपी प्रभू पुजारी याने त्यांना गुन्ह्यात समाविष्ट करून घेतले. दरम्यान ऑक्टोबर महिन्यातील गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनाचा वापर उनावणे प्रकरणात करण्यात आला. ही चारचाकी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली. त्यावरून पोलिसांनी तपास केला.
सीसीटीव्ही फुटेजवरून जाेडली गेली लिंक
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी पिंपरी, मोरवाडी, फिनोलेक्स चौक, पिंपरी गाव, काळेवाडी, रहाटणी, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी या परिसरातील दोन हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. त्यातून लिंक तयार करून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.
‘दृश्यम’प्रमाणे रचला कट
‘दृश्यम’ या हिंदी चित्रपटाच्या कथानकानुसार आरोपींनी अपहरण करून खून करण्याचा कट रचला. स्वत:चा फोन न बाळगता अपहृत उनावणे यांच्या मोबाईलचा आरोपींनी वापर केला. त्या फोनवरूनही प्रत्यक्ष न बोलता संपर्कासाठी मेसेज केले. काम झाल्यानंतर उनावणे यांचा मोबाईल फोन कर्नाटककडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये फेकून दिला. त्यातून दिशाभूल झाल्याने पोलीस तपासासाठी सोलापूरपर्यंत गेले.