पावसाळ्यात थोडं सावकाश चालवा; ‘पीएमपी’ बसखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 09:31 AM2023-07-26T09:31:39+5:302023-07-26T09:31:50+5:30
दुचाकीस्वारांनी सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा, घाई करून अपघाताला आमंत्रण देऊ नये
पुणे : पावसाळ्यात गाड्या घसरून अपघात होण्याचे प्रमाण जास्त असते. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहने चालविताना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे व पीएमपी बसचालकांनीही वाहने चालवताना काळजी घेण्याचे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात येत आहे. गुरुवारी (दि. २०) जुलै पावसात दुचाकी घसरल्याने पीएमपीएल बसच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हडपसर भागात घडली.
या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या चालकांनी बस चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणेबाबत व काळजी घेण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत तसेच खासगी दुचाकी, चारचाकी व इतर वाहनचालकांनी वाहने चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे व योग्य काळजी घेऊन रस्त्यावरील अपघात टाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर बीआरटी मार्गातून खासगी वाहने चालवणे धोकादायक आहे. दुचाकीस्वारांनी सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा, घाई करून अपघाताला आमंत्रण देऊ नये व सर्वांनी वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळावेत, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.