पेट्रोलशिवाय चालवा गाडी; पुण्यात आरटीओचा वाहन महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:01 PM2017-10-08T15:01:24+5:302017-10-08T15:20:12+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे विभाग व ई व्हेईकल असोसिएशन आॅफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ई वाहन महोत्सव आणि ई वाहनांचे प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे विभाग व ई व्हेईकल असोसिएशन आॅफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ई वाहन महोत्सव आणि ई वाहनांचे प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी सकाळी १०.३० वाजता रश्मी उर्ध्वरेशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे आदी उपस्थित होते. प्रदर्शनात विजेवर चालणार्या बस, ई-रिक्षा, सायकल, बाईक, तसेच मालवाहतूक टेम्पो, सोलर पॅनेल, टेम्पो अशा विजेवर चालणार्या वाहनांचा समावेश होता.
विजेवर चालणार्या या वाहनांना पेट्रोलची गरज लागत नाही. प्रदूषण टाळण्याचा हेतूने या वाहनांचा वापर करणे फार महत्त्वाचे आहे. ई शालेय बस या वाहनामध्ये २५ लोक बसू शकतात, एवढ्या आसनव्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ही बस १२० किलोमीटरचा प्रवास करू शकते. यासाठी वापरलेले मटेरियल हे मेड इन इंडिया असून कॅमेरा आणि जी. पी. एस. सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. या सिस्टीममुळे पालकांना आपला मुलगा बसमध्ये सुरक्षित आहे की नाही ते कळणार आहे. शिवाय बस चालवणे अत्यंत सोपे आहे.
ई सायकल आणि बाईक या वाहनांमध्ये सायकलला एक इलेक्ट्रॉनिक किट दिले जाते. या किटमध्ये बॅटरी, चार्जर, स्पीड मीटर या गोष्टी आहेत. हे कीट आपण कुठल्याही सायकलला सहज बसवून घेऊ शकतो. पूर्णपणे चार्ज केल्यावर ३० किलोमीटरचा प्रवास करू शकते आणि चार्जिंग संपल्यावर साधारण सायकलसारखी चालवता येते. तर बाईकमध्ये पूर्णपणे चार्ज केल्यावर ७० ते ८० किलोमीटरचा प्रवास करता येतो.
ई टेम्पो आणि ई पॅसेंजर या दोन्ही वाहनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. ई टेम्पो हे मालवाहतूक वाहन आहे. ई टेम्पो एका वेळेस ६०० किलो वजन वाहू शकते. पूर्णपणे चार्ज केल्यावर ८० किलोमीटरचा प्रवास पार करते. ई पॅसेंजर या वाहनाची एका वेळेस ५ व्यक्ती घेऊन जाण्याची क्षमता आहे. इतर सर्व सुविधा ई टेम्पोप्रमाणे आहेत. ई रिक्षा ही एकदा पूर्णपणे चार्ज केल्यावर ११० किलोमीटरचा प्रवास करते.
ई सोलर पॅनेल हे वाहन इतर वाहनांपेक्षा थोडे वेगळे आहे. त्यामध्ये एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ती १६० किलोमीटरचा प्रवास करते पण ७० ते ८० किलोमीटरच्या प्रवासानंतर ती सौर ऊर्जेची मदत घेते आणि अधिक काळ वाहन चालण्यास मदत होते.
या प्रदर्शनात ए. एंटरप्राइजेस, ओंकार ग्रुप, ई आॅटो बस, प्राणिक मार्केटिंग, सोलर आॅटो, टेरा मोटर्स, ओरेवा बाईक, कायनेटिक ग्रीन कंपन्यांचा सहभाग आहे. या सर्व वाहनांचे मटेरियल हे मेड इन इंडिया आहे.