हॉटेल चालकांचा न्यायालयाच्या निर्णयास हरताळ
By admin | Published: June 24, 2017 05:50 AM2017-06-24T05:50:22+5:302017-06-24T05:50:22+5:30
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारू विक्री करणाऱ्या दुकानांवरील बंदी कायम ठेवतानाच त्यामध्ये हॉटेल-रेस्टॉरंट आणि परमिट रूम-बारवरही बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारू विक्री करणाऱ्या दुकानांवरील बंदी कायम ठेवतानाच त्यामध्ये हॉटेल-रेस्टॉरंट आणि परमिट रूम-बारवरही बंदी असल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र अनेक हॉटेलचालकांनी नामी शक्कल लढवीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम चालविले आहे. महामागार्पासून शंभर मीटरपेक्षाही कमी अंतरावर असलेल्या अनेक हॉटेलचालकांनी प्रवेशद्वारापर्यंत पोहचण्याचा पूर्वीचा सरळ मार्ग बंद करून पाचशे मीटर लांबीचा वळण रस्ता बनवून घेतला आहे, असा आरोप माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी केला आहे.
राष्ट्रीय महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत दारु विक्री करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक हुशार हॉटेल चालकांनी नामी शक्कल लढवत त्यातूनही पळवाट शोधून काढली आहे. वाकड येथे महामार्गालगत असलेल्या काही हॉटेलांनी अजबच प्रताप केला आहे. ग्राहकांना हॉटेलला चक्क मोठी प्रदक्षिणा घालयला लावून महामार्गापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर असलेल्या हॉटेलचे प्रवेशद्वार पाचशे मीटर लांब करुन करून दाखविण्याची किमया केली आहे. असेच शहरातील महामार्गालगतच्या अनेक हॉटेलचालकांनी असेच अंतर वाढविण्याची किमया आहे. शासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांचे त्यांना आर्शीवाद आहे.