चालकाचा ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली; चार जण गंभीर, पुणे जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 05:49 PM2022-07-16T17:49:16+5:302022-07-16T17:54:51+5:30
मिलखे कुटुंबाचा भीषण अपघात....
डेहणे (पुणे : भात लावणीसाठी गावी चाललेल्या शेतकरी कुटुंबाची कारच्या (ईको) ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
पहाटेची वेळ असल्याने( ईको-एम एच १२ टी एन ९४८३) ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानंतर नायफडच्या माचन परिसरातील वळणावर गाडी दरीत कोसळली. घाटात मोठी झाडे असल्याने इको कार पलटी झाल्यानंतर गाडीचा मागचा भाग हिरडीच्या झाडावर आपटला. त्यानंतर गाडी पलटी होऊन घसरत 100 फूट खोल दरीत पडली.
सुदैवाने कारमध्ये असलेल्या सातही प्रवाशांचा जीव वाचला. यामधील तीन लहान मुले सुखरूप आहेत, परंतु इतर चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये तीन महिला आहे. शारदा सुरेश मिलखे, संजा विठ्ठल सुपे, अक्षदा सुरेश मिलखे व शांताराम विठ्ठल मिलखे हे जखमी आहेत.
यापैकी संजा विठ्ठल सुपे यांची प्रकृती चिंताजनक आहे. भिवंडीवरुन भात लावणीसाठी आलेल्या मिलखे कुटुंबाचा अपघात झाल्याने नायफडकर हळहळ व्यक्त करत आहेत. जखमींना राजगुरुनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.