ब्रेक फेल पण बसला दुसरा पर्याय हँडब्रेक; मग शिवशाहीचा अपघात झाला कसा?
By नितीश गोवंडे | Published: May 26, 2023 01:44 PM2023-05-26T13:44:56+5:302023-05-26T14:26:39+5:30
बस झाडावर जाऊन आदळली; सुदैवाने बसमधील २५ प्रवासी सुखरूप
पुणे: चिंचवडहून भुसावळला जाणाऱ्या शिवशाहीचा शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास संगमवाडी परिसरात विचित्र अपघात झाला. त्यावेळी बसमध्ये २५ प्रवासी होते. सुदैवाने बसमधील कोणालाही इजा झाली नाही. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला हे बस तपासल्याशिवाय सांगता येणार नसल्याची माहिती वाकडेवाडी (शिवाजीनगर) आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जामनेर (जळगाव) डेपोची शिवनेरी गुरूवारी भुसावळ येथून चिंचवडला आली होती. शुक्रवारी सकाळी ती भुसावळकडे जाण्यासाठी निघाली. वाकडेवाडी बस स्टँडवरून बस बाहेर पडून संगमवाडीमार्गे पुढे मार्गस्थ होत असताना संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकात फुटपाथच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळळी. या धडकेत शिवशाहीचे मोठे नुकसान झाले असून, ते झाडही जमिनीवर कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली. काहींनी बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने बस थांबवण्यासाठी तसे केल्याचे सांगितले. मात्र एसटीच्या अधिकाऱ्यांनी बसचे ब्रेक फेल झाले तर अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लायनर आपोआप कार्यान्वीत होऊन बस जागेवर थांबते, शिवाय बसला हँडब्रेक हा दुसरा पर्याय देखील असल्याने ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही अशी सांगितले.
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये शिवशाहीचे सुमारे २२१ अपघात झाले आहेत. एसटी महामंडळात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस तिच्या सुविधेपेक्षा अपघातांमुळेच जास्त चर्चेत असते. एसटी महामंडळाने जून २०१७ मध्ये शिवशाही या वातानुकूलित बस दाखल केल्या. यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचा समावेश होता.
बसची योग्य तपासणी केल्यावर नेमके काय झाले हे स्पष्ट होईल
ही बस जामनेर डेपोची होती. ती गुरूवारीच भुसावळ येथून चिंचवडला आली होती. शिवाय सकाळी चिंचवड येथून बस निघून ती वाकडेवाडीला आली, आणि तेथून पुढे देखील गेली. त्यामुळे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही. बसची योग्य तपासणी केल्यावर नेमके काय झाले हे स्पष्ट होईल. - ज्ञानेश्वर रणवरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, वाकडेवाडी (शिवाजीनगर)