पीएमपी बसच्या ब्रेकफेल अपघातांसाठी चालकांनाच ठरविले जातेय दोषी..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 07:00 AM2019-08-28T07:00:00+5:302019-08-28T07:00:02+5:30
चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे सांगत प्रशासनाकडून त्यांनाच दोषी ठरविण्यात आले आहे...
पुणे : मागील दोन आठवड्यात पीएमपी बसचे चार वेळा ब्रेक निकामी झाल्यानेच अपघात घडल्याचा दावा चालकांकडून केला जात आहे. पण चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे सांगत प्रशासनाकडून त्यांनाच दोषी ठरविण्यात आले आहे. प्रत्यक्षात अपघात झालेल्या बस जुन्या असल्याने सातत्याने तांत्रिक दोष आढळून येतात. असे असतानाही चालकांना या बस मार्गावर नेण्याशिवाय पर्याय नसतो. अपघात झाल्यानंतर चालकांनाच दोषी ठरवत वर्कशॉपमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मात्र क्लीन चीट दिली जात असल्याने चालकांमध्ये नाराजी आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील सुमारे ३५० बस ११ वर्षांहून अधिक वयोमान असलेल्या आहेत. तर त्यापेक्षा कमी वर्षाच्या बसची धाव निश्चित धावेपेक्षा जास्त झालेली आहे. त्यामुळे या बसमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड होत असतो. परिणामी, ब्रेकफेल, ब्रेकडाऊन, विविध कारणांनी अपघात होतात. अपघात झाल्यानंतर अपघात विभागाकडून त्याची कारणे शोधली जातात. बहुतेक अपघातांमध्ये चालकच दोषी ठरत असल्याचे अधिकारी सांगतात. आगारातून बस मार्गावर आणण्यापुर्वी चालकाने ब्रेकसाठीच्या हवेचा दाब, स्टेअरींग, इंधन, गिअर, क्लच, टायरमधील हवा या गोष्टी तपासणे आवश्यक आहे. पण काही चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपघात होत असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला.
मागील दोन आठवड्यात झालेल्या चारही अपघातांमध्ये चालकांनी ब्रेकफेल झाल्याचा दावा केला आहे. पण, अपघात विभागाच्या तपासणीत मात्र चालकांचा निष्काळजीपणा कारणीभुत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी (दि. २६) दिवे घाटात झालेला अपघात ब्रेकफेल मुळे झाल्याचे प्रवाशांकडूनही सांगण्यात आले. पण ब्रेकफेलमुळे अपघात झाला नसल्याचे पीएमपी प्रशासनाचा प्राथमिक अहवाल सांगतो. घाट उतरताना बसचा वेग अनियंत्रित होता. बस डोंगराला ४० ते ५० फुट अंतर घासली आहे. तसेच ब्रेकफेल झाल्यास हँडब्रेकचा पर्याय असतो. पण हँकब्रेक सुस्थितीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला असून चालकावर कारवाई करण्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. आंबेगाव बु. व भारती विद्यापीठासमोर झालेल्या अपघातांमध्येही चालकांनाच दोषी ठरवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये वर्कशॉपमधील अधिकारी व कर्मचाºयांना मात्र केवळ विचारणापत्र देऊन सोडल्याचे सुत्रांनी सांगितले.
-------------
जुन्या बस हद्दपार करा
पीएमपीच्या ताफ्यात १२ वर्षांपुढील ९८ तर ११ ते १२ वर्षांमधील २९६ बस आहेत. या बस तातडीने ताफ्यातून काढून टाकण्याची मागणी चालकांकडून केली जात आहे. बस मार्गावर आणतात सुस्थितीत वाटत असल्या तरी प्रत्यक्ष मार्गावर आल्यानंतर अनेकदा तांत्रिक बिघाड होतो. या बस मार्गावर चालविणे चालकांसाठी खुप कठीण जाते. पण दुसरा पर्याय नसल्याने या बसच चालवाव्या लागतात. अपघात झाल्यास चालकांना दोषी ठरविले जाते, हे चुकीचे असल्याची भावना चालकांनी व्यक्त केली. काही अपघात चालकांच्या निष्काळजीपणामुळे होतही असतील पण सरसकट चालकच कसे दोषी ठरतात. अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित का केली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.कारवाई होते
अपघातानंतर चालकांप्रमाणेच वर्कशॉपमधील अधिकाºयांवरही अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. पण बस जुन्या असल्याने कारवाईलाही मयार्दा येतात. सध्या बसची संख्याच कमी असल्याने या बस मार्गावर सोडव्या लागतात, असे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.... तर ड्युटी नाही
चालकांकडून जुन्या बस घेण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असते.अनेकदा कंत्राटी चालकांना ड्युटी दिली जात नाही. त्यामुळे त्यांची त्यादिवसाची हजेरी लागत नाही. काहीवेळा वरिष्ठांकडून जाणीवपुर्वक जुन्या बस देण्याचे प्रकार घडतात, असे व्यथा चालकांनी सांगितली.