वाहनचालकांनो सावधान, पिंपरी-चिंचवड शहरात १६ ‘ब्लॅक स्पाॅट’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 09:24 AM2022-11-22T09:24:09+5:302022-11-22T09:24:55+5:30
वाहनचालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेत वाहन चालवावे, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे...
पिंपरी : रस्ते अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती पुढाकार घेते. या समितीकडून अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पाॅट) निश्चित केले जातात. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सद्यस्थितीत १६ ब्लॅक स्पाॅट आहेत. या ठिकाणी वाहनचालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेत वाहन चालवावे, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका व पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध प्रशासकीय यंत्रणांकडून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. तरीही शहरात अपघातांचे सत्र सुरूच आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे त्यात भर पडते. त्यासोबतच ब्रेक फेल होणे, गतिरोधकावरून वाहन आदळणे, रस्ता दुरवस्थेत असणे, सिग्नल यंत्रणा नसणे, रस्त्यांवर प्रकाश व्यवस्था नसणे अशा विविध कारणांनीही अपघात होतात.
दर तीन महिन्यांनी आढावा
जिल्हास्तरावर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कार्यान्वित आहे. यात जिल्हाधिकारी, परिवहन विभाग, पोलीस, महापालिका, अरोग्य विभाग, रस्ते-महामार्ग विभागाचे अधिकारी यांचा या समितीत समावेश असतो. या समितीची दर तीन महिन्यांनी बैठक होते. त्यामध्ये रस्ता सुरक्षेबाबत आढावा घेतला जातो. ‘ब्लॅक स्पाॅट’ निश्चित केले जातात. तसेच या स्पाॅटवर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सूचवल्या जातात. सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशिक्षण, प्रबोधन, जनजागृती यासह विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन समितीकडून केले जाते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील ‘ब्लॅक स्पाॅट’
- चिंबळी फाटा
- कुरुळी फाटा
- चाकण-तळेगाव चौक
- साबळेवाडी चौक
- बोराडेवाडी वस्ती
- खालुंब्रे
- सोमाटणे फाटा
- लडकत पेट्रोलपंप
- सेंट्रल चौक
- शिंदे पेट्रोलपंप
- किवळे पूल
- तळेगाव स्टेशन चौक
- वाकडनाका
- सुतारवाडी
- पुनावळे पूल
- भक्तीशक्ती चौक
या आहेत उपाययोजना
ब्लॅक स्पाॅटची पाहणी करून गतिरोधक, रबर स्ट्रिप बसविणे, धोकादायक वळण असल्यास सूचना फलक लावणे, सिग्नल बसवणे, अशा विविध उपाययोजना केल्या जातात. तसेच अपघातस्थळी त्वरित मदत उपलब्ध झाल्यास अपघातग्रस्तांना दिलासा मिळून अनेकांचे प्राण वाचविण्यात यश येऊ शकते. त्यामुळे द्रुतगती मार्ग, महामार्ग तसेच इतर आवश्यक ठिकाणी रुग्णवाहिका व मदत पथके तत्पर ठेवली जातात.
चाकण, देहूरोड, हिंजवडीत सर्वाधिक मृत्यू
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव - चाकण-शिक्रापूर मार्ग, मुंबई-बेंगळुरू महामार्ग असे महत्त्वाचे पाच मार्ग असून, मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या मार्गांवर चाकण, देहूरोड व हिंजवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्यात कात्रज-देहूरोड बायपासवर प्राणांतिक अपघातांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बायपासवर वाहन हळू आणि सुरक्षित चालविणे आवश्यक आहे.
वेगाचा थरार, बेततोय जीवावर अनेकांकडून वाहने दामटली जातात. द्रुतगती तसेच महामार्गावर रस्ता मोकळा दिसताच असे प्रकार काही वाहनचालकांकडून केले जातात. वेगाचा थरार अनुभवण्याची त्यांना हौस असते. मात्र, हीच हौस जीवावर बेतल्याचे अनेक अपघातांवरून दिसून येते. अतिवेगाने वाहन चालविल्यामुळेच असे अपघात होतात. असे प्रकार रोखण्यासाठी ठिकठिकाणी स्पीडगनचा वापर केला जातो. वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर त्या माध्यमातून कारवाई केली जाते.