वाहनचालकांनो सावधान, वाहतूक कोंडीने गळून पडेल अवसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 03:23 PM2022-07-04T15:23:45+5:302022-07-04T15:29:54+5:30
चांदणी चौकात रस्त्याच्या कामांमुळे समस्या...
- नारायण बडगुजर
पिंपरी : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुगल मॅपवरून ड्राईव्ह घेण्यात येत आहे. यात चांदणी चौक आणि तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर आले. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते चाकण आणि मुंबई-बेंगळुरू महामार्गावर वाकड ते चांदणी चौक दरम्यान अवजड वाहने भर रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार दररोज घडतात. परिणामी वाहतूक कोंडी होत असल्याचे गुगल ड्राईव्हवरून समोर आले. त्यामुळे चालकांनी या मार्गांवर सतर्क राहून वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यात वाहतूक कोंडीची माहिती घेण्यासाठी गुगल मॅपवरून ड्राईव्ह घेण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वाहतूक कोंडी किंवा वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याचे गुगल मॅपवरून सूचित केले जाते. आयुक्तालयाच्या हद्दीतील रस्त्यांवरील वाहतुकीचा आढावा गुगल मॅपवरून घेण्यात येत आहे. वाहतुकीची समस्या असल्याचे गुगल मॅपवरून दिसून आल्यास संबंधित ‘लोकेशन’वर वाहतूक पोलीस पाेहूचन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात.
त्रिवेणीनगर चौकात सायंकाळी कोंडी
तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकात दररोज सायंकाळी वाहतूक कोंडी होते. निगडी येथील लोकमान्य टिळक चौक, भक्तीशक्ती चौक, थरमॅक्स चौक तसेच तळवडे गावठाण येथून वाहने त्रिवेणीनगर चौकात येतात. मात्र या चौकात रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. स्पाईन रस्त्याचे काम न झाल्याने त्यात भर पडते.
चांदणी चौकात रस्त्याच्या कामांमुळे समस्या
गेल्या काही महिन्यांपासून चांदणी चौकात रस्ते आणि उड्डाणपुलांचे कामे सुरू आहे. त्यामुळे येथे वाहतुकीत काही बदल केले आहेत. मात्र तरीही या चौकात मोठी रहदारी असल्याने वाहनांचा खोळंबा होऊन वाहतूक कोंडी होते. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत कोंडी होण्याचे प्रमाण जास्त आहे.
अवजड वाहनांचे करायचे काय?
मुंबई-बेंगळुरू महामार्गावर वाकड ते चांदणी चौकादरम्यान तसेच पुणे- मुंबई महामार्गावरील नाशिक फाटा ते चाकण दरम्यान एमआयडीसीतील अवजड वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. यातील काही वाहने भर रस्त्यात बंद पडतात. अवजड वाहनांची नियमित देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे. त्याकडे काही वाहनचालक दुर्लक्ष करतात. परिणामी बिघाड होऊन वाहने भर रस्त्यात बंद पडतात.
दोन महिन्यांत ६० वेळा बंद पडले वाहन
पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते चाकण दरम्यान दोन महिन्यांच्या कालावधीत ३५ वेळ अवजड वाहन भर रस्त्यात बंद पडले. तसेच मुंबई-बंगळूर महामार्गावर वाकड ते चांदणी चौक दरम्यान २५ वेळा वाहन भर रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार घडले. अशा वाहनांच्या टोईंगसाठी क्रेनची मदत घेण्यात येते. मात्र यात किमातन अर्धा तास जातो. या वेळेत वाहतुकीचा खोळंबा होतो.
रस्तादुभाजकांचे ‘पंक्चर’ काढले
रस्त्यावरील दुभाजक तोडून वाहने दामटली जातात. त्यामुळे वाहनांचा खोळंबा होऊन अपघात होतात. दुभाजक तोडलेल्या ठिकाणांना ‘पंक्चर’ असे म्हणतात. देहूगाव ते मोशी या मार्गावरील अशा १० ठिकाणी रस्ता दुभाजकांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच मुंबई -बंगळूर महामार्गावर वाकड ते चांदणी चौक दरम्यान तीन ठिकाणी दुभाजकांची दुरुस्ती करण्यात आली.
गुगल मॅपवरून वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यात येत आहे. कोंडी होत असल्यास संबंधित ‘लोकेशन’वर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी पोहचून वाहतूक नियमन करतात. कोंडीची ठिकाणे निश्चित करण्यात येत असून, त्यानुसार उपाययोजना करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.
- आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड