देशभरातील ड्रायव्हर दिल्लीत धडकणार; जंतर-मंतरवर 26 फेब्रुवारीला आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 11:28 AM2024-02-17T11:28:40+5:302024-02-17T11:30:02+5:30
पुणे : चालक मालकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करणे, वेल्फेअर बोर्डची स्थापना करणे, ड्रायव्हर दिवस घोषित करणे, हिट ॲण्ड रन ...
पुणे : चालक मालकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करणे, वेल्फेअर बोर्डची स्थापना करणे, ड्रायव्हर दिवस घोषित करणे, हिट ॲण्ड रन कायदा मागे घेणे यासह विविध मागण्यांसाठी देशभरातील चालक-मालक दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन छेडणार आहेत. येत्या दि. २६ फेब्रुवारीला हे आंदाेलन केले जाईल, अशी माहिती ऑटो, टॅक्सी, टेम्पो, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.
याप्रसंगी मासाहेब कॅब संघटनेचे अध्यक्षा वर्षा शिंदे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अशोक साळेकर, मनसे वाहतूक विभागाचे अध्यक्ष किशोर चिंतामणी, आम आदमी पक्षाचे संघटक एकनाथ ढोले, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष महंमद शेख, कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील, उपाध्यक्ष अर्शद अन्सारी आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, चालकांच्या विविध मागण्यांसदर्भात नुकतेच देशव्यापी ड्रायव्हर जोडो अभियान राबविले. त्याला देशभरातील चालक-मालकांनी मोठा प्रतिसाद दिला. पंजाब, ओडीसा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांसह इतर अनेक राज्यांमध्ये चालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सभेच्या ठिकाणी लाखो लोकांची गर्दी जमत आहे. दिल्ली येथील जंतर-मंतरवर जोरदार आंदोलनाची तयारी सुरू केली असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.
मंगळवारच्या संपाला पाठिंबा नाही :
काही बोगस संघटनांनी मंगळवारी (दि. २०) रिक्षा कॅब बंद जाहीर केले असून, त्यात आम्ही सहभागी होणार नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व बहुसंख्य कॅब व रिक्षा सुरू राहतील, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली. ज्या संघटनेने बंद पुकारला ती संघटना बोगस असून, त्यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांनी आतापर्यंत गुंडगिरी प्रवृत्ती करून रिक्षाचालकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी आम्ही केली आहे, असेही बाबा कांबळे यांनी सांगितले.