ड्रायव्हिंग स्कुल चालकांना मिळणार प्रशिक्षण; देशातील पहिलाच उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 11:25 AM2020-12-09T11:25:33+5:302020-12-09T11:28:15+5:30
आरटीओ व सीआयआरटीचा पुढाकार
पुणे : वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाºया मोटार ड्रायव्हिंग स्कुलमधील चालकांनाच आता ‘ट्रेन द ट्रेनर’ या संकल्पनेअंतर्गत तंत्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक संस्था (सीआयआरटी) व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. मंगळवार (दि. ८) पासून या प्रशिक्षणाला सुरूवात झाली असून हा देशातील पहिलाच उपक्रम ठरला आहे.
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभुमीवर ‘ट्रेन द ट्रेनर’ ही संकल्पना पुढे आली आहे. ‘सीआयआरटी’कडून पाच दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशननेही याबाबतचा प्रस्ताव दिला होता. या अभ्यासक्रमाची सुरूवात मंगळवारपासून करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ८ ते १२ डिसेंबर आणि १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत प्रत्येकी ३० याप्रमाणे पुण्यातील एकुण ६० स्कुलचे मालक किंवा एका प्रशिक्षकाला प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असून पुढील टप्प्यात सर्वच ड्रायव्हिंग स्कुलसाठी हा अभ्यासक्रम बंधनकारक केला जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना, व्यक्तिमत्व विकास, रस्ते सुरक्षा, चांगला प्रशिक्षक कसा असावा याबाबतचे मार्गदर्शन केले जाईल.
अभ्यासक्रमाच्या उदघाटनप्रसंगी परिवहन आयुक्त कार्यालयाचे रस्ता सुरक्षा विभागातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव, पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, सीआयआरटीचे प्रशांत काकडे, ड्रायव्हिंग स्कुल संघटनेचे अध्यक्ष राजु घाटोळे आदी उपस्थित होते. पुण्यात सुमारे ४५० तर राज्यात सुमारे १७ हजार ५०० सरकारमान्य स्कुल असून या सर्वांना हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे घाटोळे यांनी सांगितले.