ग्रामीण भागातील महिलांना मिळणार ड्रायव्हिंग प्रशिक्षण
By Admin | Published: June 10, 2017 01:54 AM2017-06-10T01:54:48+5:302017-06-10T01:54:48+5:30
महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनातून, १८ वर्षांवरील मुली आणि महिलांना मोफत चारचाकी वाहन चालवण्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनातून, १८ वर्षांवरील मुली आणि महिलांना मोफत चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. यामुळे आता ग्रामीण भागातील महिलांना चारचाकी वाहन शिकल्याने, स्कूल बस किंवा इतर कामे करता येणार आहेत. यासाठी पन्नास लाखांची तरतूद केल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या माजी सभागृहातील सदस्यांनी शेवटच्या सर्वसाधारण सभेमध्ये महिलांना वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण देण्याची योजना राबवावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना केली होती. या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी पन्नास लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेने नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असते. जिल्हा परिषदेने राबविलेल्या अनेक योजनांची राज्य सरकारनेदेखील वेळोवेळी दखल घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने पुढच्या काळात ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी येत्या काळात योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार दुचाकीसाठी दीड हजार व चारचाकी वाहन प्रशिक्षणासाठी तीन हजार रुपये निधी महिलांना देणार आहे. स्कूल बस किंवा इतर प्रवासी वाहने चालवून महिला व्यवसाय करू शकणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेने ही योजनेचा निर्णय घेतला आहे.