Pune: पुणे शहरात रिमझिम पावसाची हजेरी; दुपारी पडले लख्ख ऊन
By श्रीकिशन काळे | Published: August 17, 2023 03:21 PM2023-08-17T15:21:36+5:302023-08-17T15:23:01+5:30
शहरात २० ऑगस्टपर्यंत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे....
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वरूणराजाने पुणे शहरात विश्रांती घेतली होती. परंतु, आता पुन्हा त्याने आपली हजेरी लावायला सुरू केली आहे. गुरूवारी सकाळीच आकाश भरून आले आणि हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. या महिना अखेरीस चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. शहरात २० ऑगस्टपर्यंत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
पावसाने जून महिन्यात उशीरा हजेरी लावली. त्यानंतर जून अखेरीस चांगला बरसला आणि ऑगस्ट महिन्यातही सुरवातीला सुटी घेतली होती. हलक्या ते मध्यमस्वरूपाचा पाऊस होत होता. त्यानंतर पुन्हा सुटी घेऊन आता महिनाअखेरीस तो बरसण्यासाठी सज्ज झाला आहे. गुरूवारी सकाळपासून शिवाजीनगर, पाषाण, मगरपट्टा, लोहगाव या ठिकाणी पाऊस झाला. सकाळी आकाशात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी पुन्हा लख्ख उन्हाचा अनुभव पुणेकरांना आला. सायंकाळी पुन्हा आकाशात ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शहरातील आजचा पाऊस
शिवाजीनगर : ०.९ मिमी
पाषाण : ०.८ मिमी
लोहगाव : २.४ मिमी
मगरपट्टा : ०.५ मिमी