पुणे शहरातील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण; इमारतीची उंची, बांधकामाची मोजणी होणार
By राजू हिंगे | Published: April 15, 2024 02:26 PM2024-04-15T14:26:32+5:302024-04-15T14:29:36+5:30
महापालिकेकडे असलेल्या नोंदी आणि या माहितीची सांंगड घालून संबंधित मिळकतींची कर आकारणी झाली आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे....
पुणे :पुणे महापालिका शहरातील सर्व मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात इमारतीची उंची आणि बांधकामाची मोजणी केली जाणार आहे. महापालिकेकडे असलेल्या नोंदी आणि या माहितीची सांंगड घालून संबंधित मिळकतींची कर आकारणी झाली आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे.
मिळकत कर विभागाला २०२३-२४ या आथिक वर्षात २ हजार २७३ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. हे गेल्या वर्षीच्या उत्पन्नापेक्षा ३०८ कोटींनी जास्त आहे. पण मिळकत कर विभागाला अर्थसंकल्पात असलेले उदिष्ट पूर्ण करता आले नाही. त्यामुळे मिळकत कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी आतापासून प्रयत्न केले जात आहे. त्यातुन नवीन मिळकतीची नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी मिळकत कराची चुकवेगिरी करणाऱ्या मिळकती शोधल्या जाणार आहेत. त्यासाठी मिळकतीचे पुन्हा ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे.
महापालिकेकडून २०१४ मध्ये शहरात जीआयएस मॅपिंगद्वारे मिळकतींचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीकडून शहराच्या मिळकतींची प्रत्यक्ष पाहणीही केली होती. या पाहणीत ज्या मिळकतींचा व्यावसायिक वापर केला जात आहे. ज्या ठिकाणी भाडेकरू राहत आहेत त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते त्यानंतर पालिकेने ९७ हजार मिळकतींची ४० टक्के सवलत रद्द केली होती, त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर आता पालिकाना नव्याने ड्रोन द्वारे सर्वेक्षण करणार आहे.