विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन, सीसीटीव्हींचा ' वॉच'  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 04:28 PM2019-09-11T16:28:49+5:302019-09-11T16:44:32+5:30

पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही तसेच ड्रोनच्या सहाय्याने वॉच ठेवण्यात येणार आहे़. 

Drones and CCTV Watch on ganesh immersion miravnuk | विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन, सीसीटीव्हींचा ' वॉच'  

विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन, सीसीटीव्हींचा ' वॉच'  

googlenewsNext
ठळक मुद्देपारंपारिक पद्धतीने होणार सुरुवात : ९ हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुणे : संपूर्ण जगभरातील भाविकांचे आकर्षण असलेल्या पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही तसेच ड्रोनच्या सहाय्याने वॉच ठेवण्यात येणार आहे़. सुमारे ९ हजाराहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे़. दरवर्षीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणुकीत सुरुवातीला मानाची गणपती मंडळे सहभागी होणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सांगितले़. 
काही मंडळांनी लक्ष्मी रोडवरुन आम्हाला सकाळी ७ वाजता मिरवणुक काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती़. त्याला मानाच्या गणपती मंडळांनी विरोध केला़. त्यानंतर पोलिसांनी दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीला सुरुवात होईल़. त्यांच्या वेळेत कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले़. विसर्जन मिरवणुकीत प्रमुख मार्गावर ३९ ठिकाणी एकूण १६९ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्याद्वारे मिरवणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे़. शहरात बसविण्यात आलेल्या २८ हजार सीसीटीव्ही कॅमेरे यांचीही मदत घेण्यात येणार आहे़. पोलिसांच्या वतीने दोन ठिकाणी ड्रोनद्वारे मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे़. कोणत्याही खासगी ड्रोनला मिरवणुक काळात परवानगी देण्यात येणार नाही़. 
विसर्जन मिरवणुकीसाठी फरासखाना नियंत्रण कक्ष व मुख्य नियंत्रण कक्ष या ठिकाणी राखीव पोलीस दल ठेवण्यात येणार आहे़. त्यात ५ जलद प्रतिसाद पथके, वज्र, लिमा, वरुण व ५ दंगल नियंत्रण पथके, शिवाजीनगर मुख्यालयात ४ स्ट्रायकिंग फोर्स, मुख्य नियंत्रण कक्षात २ स्ट्रायकिंग फोर्स राखीव ठेवण्यात आले आहेत़.  बेलबाग चौकात फिरते नियंत्रण कक्ष ठेवण्यात आले आहे़. विसर्जन मिरवणुकीच्या सर्व मागार्ची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे़. 
गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त शांतता समिती, मोहल्ला कमिटी, पोलीस मित्र, गणेश मंडळांचे पदाधिकारी, ढोलताशा पथक, डी जे डॉल्बी चालक व मालक अश विविध घटकांच्या ३७७ बैठका घेण्यात आल्या़.
़़़़़़़
* नागरिकांनी पोलिसांचे कान, डोळे बनावे, पोलीस आयुक्तांचे आवाहन.
* खासगी ड्रोनला परवानगी नाही़. 
* बॉम्बशोधक व नाशक विभागाची ७ पथके कार्यरत राहणार.
* गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पाच परिमंडळात स्पॉटर किटचा वापर.
* मानाच्या गणपतींना ३ तर इतर मंडळांना २ ढोल पथकांना परवानगी.
* ८७ ढोल पथकांच्या वादकांना ओळखपत्रांचे वितरण.
* एकाच मंडळापुढे वादन करण्याची ढोल पथकांना परवानगी.
* एका पथकात ४० ढोल व एकूण १०० जणांना परवानगी
* ढोल पथकांना उलटे फिरता येणार नाही़ मिरवणुक मागार्ने पुढे जावे लागणार
* ढोल ताशे पथकांना टेम्पो पेठांमध्ये आणता येणार नाही़ .
* गेल्या वर्षी ४४ मंडळांवर ध्वनी प्रदुषणाचे गुन्हे दाखल.

यंदा ७ व्या दिवसापर्यंत १२ मंडळांवर ध्वनी प्रदुषणविषयक कारवाई९ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त.

 विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी पुणे शहर पोलीस दलाला बाहेरुनही मदत मिळाली आहे़ शहरातील ९ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर राहणार असून त्यात ४ अपर पोलीस आयुक्त, १२ पोलीस उपायुक्त, २९ सहायक पोलीस आयुक्त, १५० पोलीस निरीक्षक, ४६१ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ७ हजार४५७ पोलीस कर्मचारी, एस आर पी एफच्या २ कंपन्या, असा बंदोबस्त लावण्यात आला आहे़ तसेच बाहेरुन २ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, १६ पोलीस निरीक्षक, ८० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २५० कर्मचारी व २९३ होमगार्ड असा तगडा बंदोबस्त आला आहे़ 
....................
विसर्जन मिरवणुकीच्या काळात शहरातील बंद असणारे रस्ते
शिवाजी रोड : सकाळी ७ पासून मिरवणुक संपेपर्यंत
लक्ष्मी रोड : संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक, सकाळी ७ ते मिरवणुक संपेपर्यंत़
बगाडे रोड : सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक, सकाळी ९ ते मिरवणुक संपेपर्यंत
बाजीराव रोड : बजाज पुतळा ते फुटका बुरुज चौक, सकाळी १२ ते मिरवणुक संपेपर्यंत
कुमठेकर रोड : सकाळी १० ते मिरवणुक संपेपर्यंत
केळकर रोड : दुपारी १२ ते मिरवणुक संपेपर्यंत
गणेश रोड : दारुवाला पुल ते जिजामाता चौक, सकाळी १० ते मिरवणुक संपेपर्यंत
गुरुनानक रोड, टिळक रोड : सकाळी ९ ते मिरवणुक संपेपर्यंत
शास्त्री रोड : सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक, दुपारी १२ ते मिरवणुक संपेपर्यंत
डेक्कन जिमखाना भागातील रस्ते सायंकाळी ४ वाजल्यानंतर मिरवणुक संपेपर्यंत बंद राहणार आहेत़ त्यात 
जंगली महाराज रोड : झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक, 
कर्वे रोड : नळस्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक, 
फर्ग्युसन रोड : खंडोजीबाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट
भांडारकर रोड : पी वाय सी जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक
प्रभात रोड : डेक्कन पोलीस ठाणे ते शेलारमामा चौक
पुणे सातारा रोड : व्होल्गा चौक ते जेधे चौक
सोलापूर रोड : सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक
.................
विसर्जन मिरवणुकीच्या काळात शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक शाखेने रिंग रोडची आखणी केली असून वाहनचालकांनी त्याचा वापर करण्याचे आवाहन केले.

Web Title: Drones and CCTV Watch on ganesh immersion miravnuk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.