Pune: ड्रोनमुळे भूसंपादनाचा अचूक मोबदला ठरणार, रिंगरोडसाठी वापर; ४५ किलोमीटरचे सर्वेक्षण पूर्ण
By नितीन चौधरी | Published: October 31, 2023 04:32 PM2023-10-31T16:32:46+5:302023-10-31T16:34:42+5:30
पीएमआरडीएच्या प्रस्तावानुसार खेड तालुक्यातील सोलू, निरगुडी आणि वडगाव शिंदे या तीन गावांच्या भूसंपादनासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे...
पुणे :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोड प्रकल्पाच्या भूंसपादनाला गती देण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जात आहे. भूसंपादन तसेच अचूक नियोजनासाठी याचा वापर केला जाणार असून आतापर्यंत ४५ किलोमीटरचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली. ड्रोनद्वारे प्राप्त माहितीचा उपयोग नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना होणार असल्याने वेळ तसेच खर्चात बचत होणार आहे. भूसंपादनाच्या मोबदल्यातही अचुकता येणार असल्याने वादाचे प्रसंग टळणार आहेत.
पीएमआरडीएच्या प्रस्तावानुसार खेड तालुक्यातील सोलू, निरगुडी आणि वडगाव शिंदे या तीन गावांच्या भूसंपादनासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा असल्याने त्यासाठी सामाजिक परिणाम अभ्यास करण्यास राज्य सरकारने सुट दिल्याने पीएमआरडीएने थेट भूसंपादनाचा प्रस्ताव दिला आहे. या भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. हा ड्रोन कॉर्स प्रकारातील असून सर्वे ऑफ इंडियाकडून याचा वापर केला जातो. या ड्रोनमुळे सर्वेक्षणातील अक्षांश व रेखांश अचूक मोजता येतात. जागेवरील किंवा क्षेत्रावरील कंटूर र्थात चर कसे आहेत, चढ उतार किती आहे, रस्ते कसे आहेत, कोणता रस्ता कोठे जोडला जात आहे, तळी, तलाव, ओढे, नाले नद्या यांची अचूक माहिती यामुळे प्राप्त होते.
रिंगरोड ज्या भागातून जात आहे, अशा शेतजमिनींच्या भूसंपादनात संबंधित शेतातील इमारती, गोठे, घर, विहिर, झाडे यांची अचूक माहिती मिळणार आहे. ड्रोनद्वारे मिळालेले चित्र याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अचूक जमीन मोजणी होऊन मोबदला देताना त्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे देणे शक्य होणार आहे. पूर्वी सर्वेक्षणात जमिनीची मोजणी केली जात असे. त्यानंतर आखणी करून स्थळ पाहणी करावी लागत होती. त्यानंतर भूसंपादन केले जायचे. आता ड्रोनमुळे स्थळपाहणीची गरज भासत नाही. कार्यालयात बसून विविध आकडेमोड करणे शक्य झाले आहे. रस्ता तयार करताना चढउताराच्या आधारे त्यासाठी माती किंवा अन्य साहित्याचा खोदाई व भराव किती करावा लागेल याचा अंदाज येणार आहे. पीएमआरडीएकडे पूर्वी दोन ड्रोन होते. मात्र, रिंगरोडसाठी हा अद्ययावत ड्रोन खरेदी केला आहे. एका उड्डाणात ७० ते ८० हेक्टरची मोजणी किंवा सर्वेक्षण केले जाते. एका चार्जिंगमध्ये ड्रोन ४५ मिनिटे उडतो.
पहिल्या टप्प्यात या तीन गावांमधील भूसंपादन करण्यात येणार असून हा टप्पा पूर्ण झाल्यावर तो एमएसआरडीसीच्या परंदवडी ते सोलू या रिंगरोडच्या टप्प्याला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक थेट आळंदी किंवा सोलू येथून एक्सप्रेस वेवरून मुंबईकडे वळविता येणार आहे. त्यामुळे कोंडी कमी होण्यास मदत होईल.
- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए