Pune | अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नववर्षाची भेट, निविदा निघाल्याने मिळणार गती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 10:02 PM2022-12-31T22:02:42+5:302022-12-31T22:03:46+5:30
लाकडी निंबोंडी उपसा जलसिंचन, योजनेचे काम सुरु होणार
सतिश सांगळे
कळस: इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे १७ गावांना वरदान ठरणाऱ्या लाकडी निंबोंडी उपसा जलसिंचन योजनेसाठी २१८ कोटी रुपये कामाची निविदा निघाल्याने या योजनेला गती मिळणार आहे. या गावांमधील सुमारे ७ हजार २५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दुष्काळी परिस्थिती असलेल्या या भागात या योजनेच्या पाण्याने नंदनवन होणार आहे.माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवर्षण ग्रस्त गावांना दिलेला शब्द अखेर खरा करुन दाखवला आहे.
इंदापुर तालुक्यात २५ वर्षांपासुन याच विषयावर विधानसभा निवडणुकीच्या सभा गाजत आहेत. मागील अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्यामुळे ३४८ कोटींची तरतुद या योजनेसाठी केली होती. अखेर गेली २५ वर्षांपासून प्रलंबित असलेली ही योजना मार्गी लावण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांचा पुढाकार महत्वाचा ठरला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भरणे यांना यासाठी मोठे पाठबळ दिल्याने या योजनेला अखेर मुहुर्त लागला आहे.
नवीन वर्षात इंदापूर, बारामती तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला यामुळे मोठी भेट मिळाली आहे. कुभांरगाव (ता. इंदापूर) येथून उचल पाणी करुन शेती क्षेत्रास बंद पाईप लाईनने, सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. तीन दशकांपासून खोळंबलेल्या लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेला अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली होती. आता या योजनेची २१८ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे.
उजनी जलाशयातून वीजपंपाद्वारे पाणी उचलून देण्याचे नियोजन आहे .या भागात नीरा डाव्या कालवा व खडकवासला कालव्याचे पाणी जात नव्हते. त्यामुळे शेती अडचणीत होती या गावांतील शेतकऱ्यांना या योजनेतून पाणी मिळण्यास मदत होणार आहे .योजना आगामी काळात मार्गी लागणार असल्याने विरोधकांना मोठे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पकड यामुळे मजबुत होणार आहे.
या योजनेच्या माध्ममातुन इंदापूर तालुक्यातील गावे व सिंचन होणारे क्षेत्र हेक्टरी मध्ये लाकडी (७४०), निंबोडी (४५५) काझड (५१३) शिंदेवाडी (५४३) निरगुडे (६६५) लामजेवाडी (२३८) म्हसोबावाडी (७५६) शेटफळगडे (१३८) वायसेवाडी (१६२) धायगुडेवाडी (१२२) या १० गावंमधील ४३३८ हेक्टर क्षेत्र,तर बारामती तालुक्यातील कटफळ (७४४) सावळ (९०४) जैनकवाडी, (४७७) पारवडी (२०८) कन्हेरी (२५७) काटेवाडी (२१६) गाडीखेल (१०२) तालुक्यात एकुण क्षेत्र २९१३ हेक्टर क्षेत्राला या योजनेचा फायदा होणार आहे.
...तर पुन्हा मत मागायला गावात येणार नाही!
मागील काही महिन्यांपुर्वी निंबोडी येथे झालेल्या सभेत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास गावात मतदान मागण्यासाठी येणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र, भरणे यांनी हे आव्हान पेलत योजना पूर्णत्वास आणली आहे.