दुष्काळी गावांना मिळणार दिलासा

By admin | Published: August 7, 2016 04:05 AM2016-08-07T04:05:06+5:302016-08-07T04:05:06+5:30

पुरंदर तालुक्यांतील दुष्काळी गावांना खडकवासला, भीमा नदीतून पाणी देण्यात येणार आहे. या संदर्भात आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झालेल्या

Drought affected villages will get relief | दुष्काळी गावांना मिळणार दिलासा

दुष्काळी गावांना मिळणार दिलासा

Next

बारामती : पुरंदर तालुक्यांतील दुष्काळी गावांना खडकवासला, भीमा नदीतून पाणी देण्यात येणार आहे. या संदर्भात आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.
जिल्ह्यातील आमदार, खासदारांसह कालवा सल्लागार समितीचे सदस्य यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यासंदर्भात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी २७ जुलै रोजी पालकमंत्री गिरीश बापट यांना पत्र दिले होते. जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून बारामतीच्या जिरायती भागाला पाणीपुरवठा करून तलाव भरून घेतल्यास पाण्याची टंचाई कमी होईल. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असे त्यांनी निदर्शनास आणले होते. त्याचबरोबर पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे भीमा नदीचे पाणी उचलून या योजनेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या बारामती, पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांना दिल्यास तेथील पाणीप्रश्न सुटले. बारामती तालुक्यातील दुष्काळी ६३ गावांना मागील ५ वर्षांपासून पावसाने अवकृपा दाखवली आहे. यंदादेखील अडीच महिन्यात या भागात पाऊस नाही. जलयुक्त शिवाराची मोठ्या प्रमाणात कामे झालीत. परंतु पाऊस नसल्याने राज्यात नद्या दुथडी भरून वाहात असताना अर्धा बारामती तालुका दुष्काळी आहे. इंदापूर तालुक्यातील अनेक गावे टंचाईग्रस्त आहेत. त्यामुळे जनाई-शिरसाई उपसा योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्याच्या मागणीला आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी मान्यता दिली. त्यामुळे पाण्याची मोठी समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे दिलीप खैरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
धरण क्षेत्रासह सर्वत्र धो - धो पाऊस पडत असताना बारामती, इंदापूर, पुरंदर तालुक्यातील जिरायती गावांना दमदार पावसाची गरज आहे. बारामती तालुक्यातील जवळपास ६२ गावांना आणि त्या अंतर्गत वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास ३३ टॅँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर खरीप हंगामदेखील अडचणीत आला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी देखील जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेतून बारामती, दौंड आणि पुरंदरच्या दुष्काळी गावांना पाणी सोडण्याची मागणी पुणे पाटंबधारे मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांकडे केली होती. बारामतीच्या दुष्काळी गावांतील पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात राजकीय वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप होत असतात. किमान दोन्ही योजनांतून तलाव भरल्यास दुष्काळी गावांमधील पाणीप्रश्न मार्गी लागेल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.

उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजपुरवठा होणार आठ तास
उजनी पाणलोटक्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पाच तासांवरून आठ तासांवर आणण्यास आज (दि. ६) पालकमंत्री गिरीश बापट यांनी मान्यता दिली. याबाबत आदेश बापट यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिला. त्याअनुषंगाने राव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
आज पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमवेत कालवा सल्लागार समितीची बैठक होती. त्या बैठकीपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी पाणलोटक्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पाच तासांवरून आठ तासांवर आणण्याची मागणी केली होती. बैठकीच्या वेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी जोरदारपणे हीच भूमिका मांडली. निवेदनही सादर केले. निवेदनाची दखल घेऊन पालकमंत्री बापट यांनी पुढील कार्यवाही केली. आजच्या आदेशामुळे पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे़

Web Title: Drought affected villages will get relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.