जिल्ह्यात टंचाईच्या झळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:10 AM2021-05-08T04:10:56+5:302021-05-08T04:10:56+5:30
पुणे : जिल्ह्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणे भरल्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र धरणातून शेती आणि पिण्याच्या ...
पुणे : जिल्ह्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणे भरल्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेल्या आवर्तनामुळे पाणलोट क्षेत्रात टंचाई सुरु झाली आहे. जिल्ह्यातील २७ गावे आणि १२९ वाड्यावस्त्यांवर ४६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ३७ हजार १७२ हजार नागरिकांना याचा लाभ मिळत आहे.
गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ तसेच चांगल्या पावसामुळे सर्व धरणे भरली. जलसंधारण विभागानेही पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र, एप्रिल मे महिन्यात उन्हाची दाहकता अनुभवायला येत आहे. दुर्गम तसेच अवर्षणप्रवण परिसरात जलस्रोत आटले आहेत. यामुळे त्या ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. धरणांतून सुरू असलेल्या आवर्तनामुळे पाण्याची पातळी घटली आहे. परिणामी जिल्ह्यातील २७ गावांत आणि १२९ वाड्यावस्त्यांवर ४६ टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.
गेल्या वर्षीच्या विचार केल्यास सध्या जिल्ह्यात सुरू असलेली टँकरची संख्या ही तुलनेने कमी आहे. जिल्ह्यातील पाणीप्रश्न मिटवण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत सर्वाधिक रकमेचा टंचाई आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्याअंतर्गत जिल्ह्यात पाणीटंचाई कमी करण्यासाठी तलाव खोदणे, विंधनविहिरी खोदणे, गाळ उपसणे, नळपाणीपुरवठा योजना राबविणे अशी कामे हाती घेण्यात आली असून, ही कामे प्रगतिपथावर आहेत.
चौकट
सर्वाधिक टँकर आंबेगाव तालुक्यात
यंदा चांगल्या पावसामुळे पाण्याची स्थिती चांगली आहे. आंबेगाव, भोर, हवेली, खेड, जुन्नर या चार तालुक्यांतील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक ११ टँकरने पाणीपुरवठा होत आहे.