दुष्काळी गावात मोफत टँकर सुरू
By Admin | Published: March 21, 2017 05:06 AM2017-03-21T05:06:00+5:302017-03-21T05:06:00+5:30
प्रशासनाच्या टँकरची वाट न बघता नीरा देवघर धरण भागातील पाणीटंचाईग्रस्त गावांना राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हा परिषद सदस्य
भोर : प्रशासनाच्या टँकरची वाट न बघता नीरा देवघर धरण भागातील पाणीटंचाईग्रस्त गावांना राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांच्या वतीने मोफत पाणी टँकर वाटप सुरू करण्यात आले आहे.
नीरा देवघर धरण भागातील महाड-पंढरपूर व रिंगरोडवरील धारांबे, पऱ्हर बु., पऱ्हर खु., निवंगण, कळंबाचा माळ, शिरवली हि.मा., शिळींब, सुईरमाळ, कारुंगण येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या गावांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले आहेत. टँकरचे वाटप करण्यात येत असून त्याचा शुभारंभ शिळींब येथे करण्यात आला. या वेळी लक्ष्मण दिघे, धोंडिबा मालुसरे, विलास मादगुडे, शंकर पारठे, रवी पारठे, जिजाबा पारठे, नंदू सोनी, बाळासो धामुणसे, बापू दिघे, संदीप धामुणसे व महिला उपस्थित होत्या.
नीरा देवघर धरण भागात दर वर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. त्यामुळे सदर गावातील ग्रामपंचायती टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे देतात. मात्र हे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर ते उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवले जातात. त्यानंतर पाहणी करुन टँकर मंजुरीला पाठवतात. याला साधरणपणे एक महिन्याचा कालावधी लागत असून, प्रत्यक्षात टेंडर होऊन टँकर सुरु होण्यास विलंब लागत असल्याने नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे शिवतरे यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वखर्चाने टँकरने मोफत पाणी वाटप सुरु केले आहे. (वार्ताहर)