दुष्काळाची दाहकता वाढली : लाडक्या सर्जा-राजाला बाजारचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:15 AM2019-02-07T00:15:25+5:302019-02-07T00:16:30+5:30
दुष्काळाची दाहकता वाढल्याने चारा-पाणीटंचाईचा प्रश्नही भीषण झाल्याने शेतकरीवर्ग लाडक्या सर्जा-राजाला बाजारचा रस्ता दाखवीत आहे.
बेल्हा - दुष्काळाची दाहकता वाढल्याने चारा-पाणीटंचाईचा प्रश्नही भीषण झाल्याने शेतकरीवर्ग लाडक्या सर्जा-राजाला बाजारचा रस्ता दाखवीत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील बेल्हा (ता. जुन्नर) येथील प्रसिद्ध बैलांच्या आठवडेबाजारात असे चित्र पाहावयास मिळत असून बैलांची विक्रीस येण्याची संख्या रोडावली असून त्यांची खरेदीही रोडावली आहे. त्याची कवडीमोल भावाने विक्री करीत आहेत.
येथील सोमवारचा आठवडे बैलबाजार जिल्ह्यात व इतर जिल्ह्यांत सर्वत्रच प्रसिद्ध आहे. या बाजारात शेतकरी व व्यापारी बैल खरेदी-विक्रीसाठी येतात. या बाजाराशिवाय या बाजारात म्हशींचा बाजार व शेळ्यामेंढ्यांचा बाजार मोठा भरतो. तसेच, तरकारी बाजारही मोठा भरतो. धरण त्यांचे कालवे व नद्यांच्या लाभक्षेत्रातील काही ठिकाणांसह इतर सर्व ठिकाणी सध्या दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. उष्णतेच्या तीव्र झळांनी मानवासह पशुपक्ष्यांनाही याची झळ बसत आहे.
दुष्काळी स्थिती उद्भवल्यामुळे सध्या सगळीकडे चारा व पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग त्याच्याकडील जनावरांची बाजारात विक्री करत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून बैलांसह इतर जनावरांची विक्रीस येण्याची संख्या कमालीची कमी झाली आहे. हा बैलबाजार दोन तासांतच ओस पडत आहे. येथील बैलबाजारात गावठी बैलांच्या जोडीचा भाव ३० ते ३५ हजार होता, तर म्हैसुरी बैलजोडीचा भाव ३५ ते ४० हजार रुपये होता.
म्हशींचा बाजारभावही नेहमीच्या तुलनेत कमी होत. मात्र, दुष्काळी स्थितीमुळे त्यांची खरेदी या कमी झालेल्या बाजारभावातही होत नसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले. त्यातच शेतकरीवर्ग यांत्रिकीकरणाकडे वळालेला दिसून येत आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. त्याचा फटकाही या बैलबाजाराला बसत आहे. शेतमालाला भाव नाही, तसेच चाऱ्याचे भावही प्रचंड वाढलेले आहेत.
सध्या जनावरांचा पाण्याचा प्रश्न व चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच, शेतमालाला भाव नाही.
- सुधीर कोळेकर, भांडगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद
सध्या जनावरे संभाळणे अत्यंत अवघड झाले आहे. त्यामुळे जनावरे कवडीमोल भावाने विकण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिलेला नाही.
- शंकर शेंडगे,
बार्शी, जि. सोलापूर