पुरंदर तालुक्यात दुष्काळाचे सावट...
By admin | Published: May 29, 2017 02:06 AM2017-05-29T02:06:12+5:302017-05-29T02:06:12+5:30
पुरंदर तालुक्यातील खळद, शिवरी, वाळुंज, तक्रारवाडी, साकुर्डे, बेलसर या गावांना तसेच यांच्या वाड्यावस्त्यांना शिवरी प्रादेशिक
लोकमत न्यूज नेटवर्क
खळद : पुरंदर तालुक्यातील खळद, शिवरी, वाळुंज, तक्रारवाडी, साकुर्डे, बेलसर या गावांना तसेच यांच्या वाड्यावस्त्यांना शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणारा पिलाणवाडी जलाशय कोरडा झाला आहे. जेमतेम आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा या धरणात शिल्लक आहे. आता या भागाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ऐन यात्रांच्या मोसमात पिलाणवाडी जलाशयातील शिवरी प्रादेशिकचा जॅकवेल उघडा झाला होता, तर पाणीही दूषित झाले होते. मात्र नागरिकांची पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी म्हणुन धरणातील पाणी उचलून जॅकवेलच्या कडेला टाकून पाणी पुरवठा होत होता. हे पाणी दूषित व अनियमित पधंरा, वीस दिवसांतून येत असे, पण या परिस्थितीतही काही नागरिक नाईलाजाने पाणी पित होते. काही जण नियमित वापरासाठी याचा वापर करीत होते.
पण आता योजनाच बंद होईल व नागरिकांची भटकंती सुरू होईल, परिसरात कितीही फिरले तरी पाणी उपलब्ध होणे अवघड आहे. यामुळे टँकरने पाणीपुरवठा हा एक मेव पर्याय आहे. येथे उपलब्ध पाणीसाठा हा जेमतेम महिनाभर पुरेल अशी परिस्थिती असल्याचे प्रसारमाध्यमांनी वारंवार सांगितले, तरी या लाभार्थी गावांतील एकाही ग्रामपंचायतीने हा विषय गांभीर्याने घेतला नाही, कोणतीही पर्यायी पाण्याची व्यवस्था केली नाही यामुळे आता आठ दिवसांत त्यांच्याकडून काय व्यवस्था होणार, या बाबत नागरिकमिंध्ये संभ्रमावस्था आहे. एप्रिल, मे महिन्यात या धरणात मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. यामुळे पाणी दूषित होते. यासाठी येथे मासेमारीला बंदी घालावी अशा विविध मागण्याही होत आहेत. पण यावरही कारवाई होत नाही.
पिलाणवाडीवर नियंत्रण कोणाचे ?
याबाबत पुरंदर उपसा सिंचन व्यवस्थापन सासवड येथील शाखा अभियंता एम.डी. मोहिते यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी पिलाणवाडी जलाशय आमच्या नियंत्रणाखाली असला तरी पाण्याचे व्यवस्थापन गजानन पाणी वापर संस्था करते.
आम्ही त्यांना फक्त पाणी मोजून देतो. शेतीला पाणी सोडण्यास कोणतेही निर्बंध नाहीत. जोपर्यंत धरणात पाणी
आहे तोपर्यंत पाणी सोडता येते असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली.
एप्रिल महिन्यात पिण्यासाठी पाणी ठेवणे गरजेचे असताना अनेक पंप सुरू होते. त्यावर आपण कारवाई का केली नाही, तर आम्ही काय कारवाई करायची, लोकच ऐकत नाहीत, एमएसईबीने कारवाई करावी, आता धरणातील पाणी संपले आहे, नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, मे महिन्यात पाणी संपणारय, आता काय करणार? त्या संस्थेने ठरवायचे होते की पिण्यास पाणी किती ठेवायचे व शेतीला किती द्यायचे, असे सांगत आता पाऊस पडेपर्यंत वाट पाहायची असे सांगितले.
कुठल्याही गावाला मिळत नाही पुरेसे पाणी
गराडे जलाशयाची पाणी साठवण क्षमता ६५.३७ द.ल.घ.फू. एवढी आहे. त्यातील ५४.९७ द.ल.घ.फू. एवढा उपयुक्त पाणीसाठा असतो. मृत पाणीसाठा हा १०.४० द.ल.घ.फू. आहे. आता जलाशय कोरडा पडल्यामुळे या जलाशयावरुन कोणत्याही गावाला पुरेसे पाणी मिळत नाही.
जलाशयाच्या मृतसाठ्यात वाढ केली पाहिजे. या सहा गावांचा विचार डोळ्यांपुढे ठेवून उन्हाळ्यात जलाशयात जास्तीचा साठा ठेवला पाहिजे. यासाठी जलाशयातील पाण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे, असे गंगाराम जगदाळे यांनी सांगितले. जलाशयात मोठ्या प्रमाणावर गाळ आहे.
सहा गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
गराडे : गराडे जलाशय परिसरात सासवड, बोपगाव, हिवरे, कोडीत खुर्द, कोडीत बुद्रुक, गराडे या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. या जलाशयातील पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे या परिसरात असलेल्या विहिरींवर याचा परिणाम होऊन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. या विहिरींना पाणी नसल्यामुळे ६ ते ८ दिवसांनी वरील गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भविष्यात या विहिरींचा पाणीसाठा कायम राहावा. यासाठी गराडे जलाशयातील पाण्याचे नियोजन अगोदर केले पाहिजे. हे केले तरच या सहा गावांचा पाणीप्रश्न मार्गी शकतो. अन्यथा येणाऱ्या प्रत्येक उन्हाळ्यात या सहा गावांना पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे, असे पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक गंगाराम जगदाळे यांनी सांगितले.
कोडीत बुद्रुक येथे ६ ते ८ दिवसांतून एका आळीला पाणी येते. त्यामुळे लोकांना पर्यायी पाण्यासाठी घडपड करावी लागत आहे. गावाच्या बाजूस पाणीपुरवठा योजनेच्या गळती झालेल्या ठिकाणाहून भांड्याने पाणी भरून घेण्यासाठी महिलांची झुंबड असते. पिण्याच्या पाण्यासाठी गावकुसातील विहिरींचा आघार घ्यावा लागत आहे.