फूलउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा!
By admin | Published: February 12, 2015 02:24 AM2015-02-12T02:24:36+5:302015-02-12T02:24:36+5:30
व्हॅलेंटाइन डे’साठी विशेष महत्त्व असणाऱ्या गुलाबाच्या फुलांना या वर्षी परदेशातून मागणी वाढल्याने फूलउत्पादक शेतकऱ्यांना
काळूस / कामशेत : ‘व्हॅलेंटाइन डे’साठी विशेष महत्त्व असणाऱ्या गुलाबाच्या फुलांना या वर्षी परदेशातून मागणी वाढल्याने फूलउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. या वर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या धर्तीवर प्रतिफुलास १२ ते १५ रुपये एवढा भाव मिळत आहे. एकट्या मावळ तालुक्यात अठरा ते वीस कोटी रुपयांची उलाढाल झाली. तर खेड तालुक्यात सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
प्रेमाचे प्रतीक म्हणून जगभरातील तरुणाई या दिवशी गुलाबपुष्पांची भेट देतात. त्यात लाल रंगाच्या गुलाबाला अधिक मागणी असते. त्यामुळे टॉप सिक्रेट, बोर्डो, पॅशन या लाल रंगाच्या फुलांनी चांगलाच गल्ला कमावला. ४० ते ७० सें. मी. फुलांची निर्यात होते. त्यात ५० सें. मी. ते ६० सें. मी. उंचीच्या फुलांना जास्त मागणी आहे. सरासरी १२ ते १४ रुपये दराने फुले बाजारात विकली गेली. अमेरिका, स्पेन, जपान, जर्मनी, ब्रिटन येथे निर्यात केली. जगभरात सर्वाधिक मागणी हॉलंडमध्ये असते. १० ते १२ फुलांचा जुडा आकर्षक पद्धतीने पॅक करून निर्यात केला जातो, अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी फूलउत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)