व्यवस्थापनातूनच साधेल दुष्काळमुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 03:14 AM2017-08-09T03:14:48+5:302017-08-09T03:14:48+5:30
गेल्या ३२ वर्षांपासून भारतीय जैन संघटना समाजसेवा करीत आहे. चार वर्षांपूर्वी संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये जलसंधारणाचे मोठे काम उभे करण्यात आले. पानी फाउंडेशनसोबत बीजेएसने काम करून, समाजसेवेचा आणखी एक आदर्श घालून दिला आहे.
गेल्या ३२ वर्षांपासून भारतीय जैन संघटना समाजसेवा करीत आहे. चार वर्षांपूर्वी संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये जलसंधारणाचे मोठे काम उभे करण्यात आले. पानी फाउंडेशनसोबत बीजेएसने काम करून, समाजसेवेचा आणखी एक आदर्श घालून दिला आहे. ज्यांच्यासाठी काम केले, त्यांच्या चेहºयावरील समाधान कृतकृत्य करणारे आहे. व्यवस्थापन, साधनांची उपलब्धता आणि सेवाभावी वृत्तीमधून राज्य दुष्काळमुक्त होऊ शकेल. यापुढे राज्याची दुष्काळमुक्ती हेच आयुष्याचे ध्येय असल्याचे समाजब्रती शांतिलाल मुथ्था यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.
भारतीय जैन संघटना (बीजेएस) १९९३ पासून सामाजिक कार्यात आहे. राज्यामध्ये ओला आणि सुका अशा दोन्ही स्वरूपाच्या विरोधाभासाला तोंड द्यावे लागते. या आपत्तींमध्ये बीजेएस नेहमीच धावून गेली आहे. राज्यामध्ये २०१३ मध्ये १९७२च्या दुष्काळानंतरचा सर्वांत मोठा दुष्काळ पडला होता. बीजेएसच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्व तलावांमधील गाळ उपसण्यात आला. ११७ तलावांचे खोलीकरण करून, त्यामधील १ लाख क्युबिक मीटर गाळ डोंगराळ भागातील शेतीवर टाकण्यात आला. या कामाला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अभ्यासक, मंत्री, लोकप्रतिनिधींनी भेट दिली होती. त्याच्या परिणामस्वरूप तलावांमध्ये भरपूर पाणी जमा झालेले होते. जवळपास पाच हजार हेक्टर जमीन सुपीक झाली.
याच काळात जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भीषण बनला होता. बीजेएसने मराठवाडा आणि पुणे जिल्ह्यात तब्बल ३० छावण्या सुरू केल्या. विविध ठिकाणच्या पांजरपोळ संस्थांना सोबत घेण्यात आले. चारा उपलब्ध होईनासा झाल्यावर स्वत: खर्च करून मध्य प्रदेशातून दोन ट्रक भरून चारा आणून पुरवला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम झालेले हे देशातील पहिलेच उदाहरण होते. २०१५-१६ या काळात बीड, लातूर, उस्मानाबाद येथेही नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, गाळउपसा अशी कामे करण्यात आल्याचे मुथ्था यांनी सांगितले.
ते म्हणाले की, २०१६ मध्ये माझे मित्र महावीर जैन भेटायला आले होते. त्यांनी दुष्काळमुक्तीवर बीजेएसच्या कामाची माहिती समजून घेतली. तेथूनच अभिनेता आमिर खानला फोन करून माहिती दिली. आमिर खान, सत्यजित भटकळ यांच्याशी लगेचच आॅगस्ट २०१६ मध्ये माझी बैठक झाली. त्यानंतर तीन ते पाच तासांच्या ७ बैठका झाल्या. त्यांनी बीजेएसच्या ३२ वर्षांच्या सेवा कार्याची माहिती घेतली. आमचा अनुभव, सोशल कनेक्ट, संपर्क समजून घेतला. ‘वॉटरकप’ ही संकल्पना समजून सांगितली. त्यांना ३ तालुक्यांवरून ३० तालुक्यांवर जायचे होते. त्यासाठीचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आम्ही केले.
त्यांना दिलेल्या सूचना आवडल्या. त्या त्यांनी स्वीकारल्या. एकत्र काम करण्याविषयी चर्चा झाली; परंतु केवळ श्रमदान आणि प्रशिक्षणामधून परिणाम साधणे आणि दुष्काळमुक्ती शक्य नसल्याचे आमिरच्या लक्षात आणून दिल्यानंतर, त्याच्या पुढील काम करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यासाठी संघटनेने जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर ट्रॉलीज पुरविण्याचे आव्हान स्वीकारले. ज्या गावांनी श्रमदानाचा टप्पा पार केला आहे, त्यांनाही मशिनरी पुरविण्यात येणार होती. प्रशिक्षण आणि दुष्काळमुक्ती यांच्यामधील तफावत दूर करण्यासाठी कामाला सुरुवात करण्यात आली; मात्र सर्व जेसीबी, पोकलेन शासकीय कामात व्यस्त होत्या, अनेकांनी दर वाढविले होते. या सर्व अडचणींवर मात करीत मशिनरी उपलब्ध करून घेण्यात आली. मेळघाटासाठी तर मध्य प्रदेशातून मशिनरी आणून पाच हजार जणांचे श्रमदान घडवून आणण्यात आले. कार्यकर्त्यांची फळी तयार करून, त्यांना जबाबदाºयांचे वाटप करण्यात आले होते. ६०० कार्यकर्ते आणि मुथ्था यांच्या कार्यालयातील ४० कर्मचारी तीन महिन्यांसाठी तेथे मुक्काम ठोकून काम करीत होते. ३२ वर्षांच्या अनुभवाचा येथे कस लागला होता. मशिनसाठी डिझेल मात्र गावकºयांनी द्यायचे ठरले होते; परंतु पैसे नसलेल्या गावांची यादी आमिरने दिली. तेथे डिझेलसह मशिनरी पुरविण्यात आली. संघटनेला यामध्ये एकूण साडेचार कोटींचा खर्च आला, तर एकूण खर्च ९ कोटी रुपयांचा झाला. निधी उभा करणे अवघड होते; परंतु आम्ही हे आव्हान जिद्दीने पूर्ण केले.