पुणेकरांना पाणी कपाती मधून मिळणार दिलासा
By Admin | Published: August 5, 2016 03:58 PM2016-08-05T15:58:17+5:302016-08-05T23:50:39+5:30
गेल्या दहा महिन्यांपासून दिवसाआड पाणी कपातीचा सामना करणा-या पुणेकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 5 : गेल्या दहा महिन्यांपासून दिवसाआड पाणी कपातीचा सामना करणा-या पुणेकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे. ही कपात मागे घेण्यासाठी पालकमंत्री गिरिष बापट यांनी उद्या सायंकाळी 4 वाजता कालवा समितीची बैठक बोलाविली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणसाखमधील धरणे 80 टक्क्याहून अधिक भरली आहेत. तर खडकवासला आणि पानशेत ही धरणे 95 टक्के पेक्षा अधिक भरल्याने मुठा नदीतून तसेच खडकवासला कालव्यातून मोठया प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे.
त्यामुळे ही कपात रद्द करण्याची मागणी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसह , कॉंग्रेस आणि मनसेने केलेली होती. त्यासाठी महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन या मागणीसाठी त्यांच्या दालनात आंदोलनही केले. दरम्यान, पाणी सोडण्यावरून महापौर आणि पालकमंत्री यांच्यात रंगलेला राजकीय कलगीतुरा रंगला असून महापौरांना दोन वेळा कपात रद्द करण्याच्या केलेल्या घोषणेला बापट यांनी विरोध केला होता. मात्र, उद्या कपात रद्द करण्यावर शिक्का मोर्तब केले जाणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.