दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्र अस्वस्थ तर भाजपा सुडाच्या राजकारणात व्यस्त: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 04:37 PM2023-09-12T16:37:03+5:302023-09-12T16:40:02+5:30
भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार ईडीच्या माध्यमातून सुडाच्या राजकारणात व्यस्त...
दौंड (पुणे) : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत जनता अस्वस्थ आहे; मात्र भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार ईडीच्या माध्यमातून सुडाच्या राजकारणात व्यस्त असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, शासन आपल्या दारी यासह अन्य काही माध्यमातून महाराष्ट्रातील सरकार केवळ प्रसिद्धी करून टिमकी वाजवत आहे; मात्र दुष्काळी दौरा करायला त्यांना वेळ नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल. राज्यात पाऊस नाही, तेव्हा शासनाने शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी केली पाहिजे. मराठा, धनगर समाज यासह अन्य काही समाजांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सध्याचे शासन अपयशी ठरलेले आहे. जनतेचा उद्रेक वाढत चाललेला आहे. विरोधकांवर ईडीची कारवाई केली जाते, मग भाजपसारख्या पक्षात ईडीची कारवाई करण्याइतपत राजकीय मंडळी नाही का, असा प्रश्न उपस्थित करून भाजपचे कारनामे सत्तेपुढे दडपले जात आहेत. तेव्हा भाजपचे दडपलेले कारनामे जनता रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर केवळ पैशांची उधळपट्टी करून जाहिरातबाजी केली जात आहे. मात्र जनतेच्या प्रश्नांकडे सोयीस्कररीत्या सध्याचे शासन दुर्लक्ष करीत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी कुठलेही नियोजन नसलेले हे सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरलेले असून या सरकारला निश्चितच जनता विचारेल. भाजपने प्रादेशिक पक्षात फोडाफोडीचे राजकारण करून राजकारणासह समाजात अस्वस्थता निर्माण केली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.