दुष्काळाने मारले आणि पाटबंधारेने तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 02:25 AM2019-02-01T02:25:40+5:302019-02-01T02:25:51+5:30
नीरा डाव्या कालव्यावरील ५७ नंबर वितरिकेतून आवर्तन
रेडणी : यंदा भीषण दुष्काळाने शेतकऱ्यांना पिकांना मारले असताना पाटबंधारे विभागाच्या विभागाच्या अधिकाºयांनी केलेले काटेकोर नियोजन व पाणीचोरांवर ठेवलेला वचक यामुळे नीरा डाव्या कालव्याच्या ५७ व्या वितरिकेतून आवर्तन सोडण्यात आले होते. त्यामुळे माना टाकलेल्या पिकांना जिवदान मिळणार असून पीके तारली जाणार आहेत.
या आवर्तनामुळे बोराटवाडी, खोरोची, रेडणी, माने वस्ती (निरवांगी) येथील शेतºयांना फायदा मिळत आहे. दुष्काळाचे गांभीर्य ओळखून आत्तापर्यंत सुरू असलेली पाणीचोरी रोखून वेगात सिंचन सुरू असल्यामुळे येथील शेतकरी समाधानी आहेत. यापूर्वी नीरा डावा कालव्याचे आवर्तन नेहमीच वादात राहिले आहे. मागील वर्षी धरणांमध्ये भरपूर पाणीसाठा होता तरी देखील शेतकºयांना पाणी वेळेवर मिळाले नाही म्हणून पिके जळाली होती. पाणी चोरांमुळे जवळजवळ पन्नास टक्के पाणी चोरी जाऊन आवर्तन लांबत होते. आवर्तन लांबल्याने हेड व टेलच्या शेतकºयांमध्ये वादही निर्माण झाले होते, परंतु चालू आवर्तनामध्ये मात्र सायफन विरोधात पाटबंधारे विभागाने कंबर कसली आहे. आतापर्यंत सायफनमाफिया तुपाशी व सर्वसामान्य शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असायची, यावेळी मात्र सायफनधारकांवर जरब बसवण्यात पाटबंधारे विभाग यशस्वी ठरला आहे. चालू आवर्तनात वितरिका क्रमांक ५७ वरील दारे क्रमांक १९( बोराटवाडी) व दारे क्र. १८ (खोरोची) दोन्हीकडे पाणी पूर्ण क्षमतेने चालू होते.
पाणीचोरी रोखून नीरा डावा कालव्याचे आवर्तन समाधानकारक वेगाने सुरू असल्याचे श्रेय पाटबंधारे विभाग, पोलिस प्रशासन व महावितरणचे कर्मचारी यांना संयुक्तपणे द्यावे लागेल अशी प्रतिक्रिया पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली. चालू आवर्तनात जेवढी पाण्याची बचत होईल तेवढे पाणी शेतकºयांना उन्हाळ्यात देता येईल, असेही ते म्हणाले.
चोरी रोखल्याने दोन्ही दारे सुरू
दोन्ही दारे चालू असण्याची गेल्या दहा वर्षातील ही पहिलीच वेळ हे केवळ पाणीचोरी रोखल्यामुळे शक्य झाले. पूर्ण क्षमतेने वितरिका सुरू आहे. ज्या क्षेत्राचे सिंचन व्हायला १५ दिवस लागायचे त्या क्षेत्राचे सिंचन केवळ सात दिवसात शक्य झाले, याचे श्रेय पाटबंधारे विभागाला द्यावेच लागेल.