प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी अन् आईला भेट देण्यासाठी पुणे विद्यापीठातून कार पळवली...,
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 07:28 PM2022-11-23T19:28:05+5:302022-11-23T19:28:17+5:30
तक्रार दाखल होताच पुणे पोलिसांनी अवघ्या 24 तासात तरुणाला अटक केली
पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी अन् आईला वाढदिवसानिमित्त गिफ्ट देण्यासाठी केलेले नको ते धाडस एका तरुणाला चांगलेच महागात पडले. या तरुणाने महागडी होंडा कार पळून नेली होती. मात्र या प्रकरणी तक्रार दाखल होताच पुणेपोलिसांनी अवघ्या 24 तासात त्याला अटक केली. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. इशांत शर्मा (वय 25, रा. विमान नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेली होंडा कार एकाने विकत घेण्याच्या बहाण्याने पळवून नेली होती. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना समर्थ पोलिसांनी एके ठिकाणी ही कार घेऊन उभी असणाऱ्या ईशांत शर्माला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने ही कार चोरल्याची कबुली दिली. कार चोरण्याचे कारण ऐकल्यानंतर पोलीसही अवाक झाले.
प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी आणि वाढदिवसानिमित्त आईला गिफ्ट देण्यासाठी त्यांनी ही कार चोरली होती. ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेली कार पाहण्यासाठी तो प्रत्यक्ष गेला होता. कार पाहिल्यानंतर पसंत आहे म्हणून त्याने व्यवहारही ठरवला होता. दोन दिवसांनी आईचा वाढदिवस असून तिला गिफ्ट द्यायची आहे. त्यामुळे दोन दिवसात कार घेऊन जातो असे त्याने सांगितले होते.
दरम्यान सोमवारी दुपारी तीन वाजता तो नाना पेठेतील कबीर चौकात गाडी विकत घेण्यासाठी आला. गाडी आईला दाखवून आणतो असे सांगून तो फिर्यादीच्या भावासह गाडी घेऊन गेला. पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर प्रेयसीला व आईला गाडी दाखवून आणतो, तुम्ही इथेच थांबा असे म्हणून फिर्यादीच्या भावाला गाडीच्या खाली उतरवले. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या आवारातून गाडी घेऊन तो पळून गेला होता. पोलिसांनी त्याला अटक करून होंडा कार जप्त केली आहे.