पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
By admin | Published: April 11, 2016 12:41 AM2016-04-11T00:41:42+5:302016-04-11T00:41:42+5:30
पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा सुपे तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १०) दुपारी दीडच्या दरम्यान घडली
सुपे : पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा सुपे तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १०) दुपारी दीडच्या दरम्यान घडली.
ओंकार संजय क्षीरसागर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. विष्णू वाघचौरे, ओंकार तसेच त्याचा चुलतभाऊ संकेत क्षीरसागर आणि सुफियान कोतवाल असे चौघे जण तलावात पोहण्यासाठी गेले होते. या वेळी ओंकार व विष्णू यांना पोहण्यास येत नसल्याने ते तलावाच्या काठालगत पोहत होते, तर दुसरे दोघे जण पाण्यात आतमध्ये पोहत होते. त्यामुळे ओंकार पाण्यात पुढे पुढे जाऊ लागला. त्या वेळी विष्णूने पुढे जाऊ नको, असे सांगितले. मात्र ओंकारने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तो पुढे असणाऱ्या खोल खड्ड्य़ात जाऊन पडला. हे तिघे घाबरल्याने त्यांनी मित्रांना फोन केला.
ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ओंकारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तरुणांच्या अर्धा तासाच्या अथक प्रयत्नातून तलावाच्या काठापासून सुमारे ५० फूट अंतरावरील खोल खड्ड्यात ओंकार आढळून आला. त्याला तरुणांनी पाण्यातून वर काढले. मात्र, वाचविण्यात यश आले नाही. ओंकार हा फलटण येथील कृषी विद्यालयातून इयत्ता अकरावीची परीक्षा देऊन नुकताच घरी आला होता.