बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Published: March 28, 2017 02:32 AM2017-03-28T02:32:16+5:302017-03-28T02:32:16+5:30
बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह सोमवारी (दि.२७) दुपारी अडीचच्या सुमारास कातवी (ता.मावळ) हद्दीतील आंबी
तळेगाव दाभाडे : बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह सोमवारी (दि.२७) दुपारी अडीचच्या सुमारास कातवी (ता.मावळ) हद्दीतील आंबी एम आय डी सी रस्त्यावरील इंद्रायणी नदी पुलाजवळ नदीपात्रात तरंगताना सापडला.
ऋतिक भागुजी दळवी (वय १५ रा. गोळेवाडी (आंबी) ता. मावळ जि. पुणे) असे पाण्यात बुडून मयत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दळवी हा निगडे (ता. मावळ) येथील प्रतिक विद्यानिकेतन शाळेत दहावी वर्गात शिकत होता. तो शनिवारी (दि.२५) रोजी भूगोल विषयाचा पेपर देवून घरी आला. तो गावातून बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेवून त्याची हरवल्याची तक्रार तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.२६) रोजी दाखल केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. डॉ. प्रवीण कानडे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्याचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले.
ऋतिकचे वडील भागुजी यांचा तीन वषार्पूर्वी आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याची आई कांताबाई हिच्यावर आली. त्याची मोठी बहीण प्रियांका (११ वी) वर्गात शिकत असून लहान भाऊ अभिषेक हा (७ वी) वर्गात शिकत आहे. कुटुंबातील मोठा मुलगा असल्याने तो आईच्या कामाला हातभार लावत होता. त्यांच्या अचानक मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (वार्ताहर)