डॉ. संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या, दोषारोपपत्रासाठी सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याकडे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 11:34 AM2024-01-13T11:34:16+5:302024-01-13T11:35:07+5:30
पोलिसांनी उचललेल्या ठोस पावलांमुळे डॉ. ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत...
पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या विरोधात पुणे पोलिसांना ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे डॉ.ठाकूर यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांनी ५ जानेवारीला संबंधित विभागाच्या सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याकडे त्याबाबत परवानगी मागितली आहे. पोलिसांनी उचललेल्या ठोस पावलांमुळे डॉ. ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
त्यामुळे येत्या काही दिवसांत ललित पाटील प्रकरणात डॉ. संजीव ठाकूर यांची अटक निश्चित मानली जात आहे. या आधी याच प्रकरणात ससूनमधील वैद्यकीय अधिकारी डाॅ.समीर देवकाते यांना ललित पाटीलची शिफारस केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू आहे. पाटील प्रकरणाचा तपास सुरू आहे की बंद झाला आहे, हे समजत नाही. चौकशीच्या समितीच्या अहवालात ससूनचे तत्कालीन अधीक्षक डॉ.संजीव ठाकूर दोषी आढळले. पोलिसांनी डॉ.ठाकूर यांच्यावर कारवाई केली नाही. पोलिसांनी त्यांना सहआरोपी केली नाही. डॉ.ठाकूर यांना या प्रकरणात अटक व्हायला हवी. ललितला मदत करणाऱ्या कारागृहातील अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी वारंवार केली होती.