दीड वर्षापासून राज्यातील आरोग्य केंद्राचा औषध पुरवठा बंद : दिलीप वळसे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 01:59 AM2018-09-16T01:59:15+5:302018-09-16T01:59:17+5:30
सर्व राज्यांत औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याची टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली.
घोडेगाव : राज्यातील आरोग्य खाते वाऱ्यावर पडले आहे, कारण या खात्याला मंत्रीच नाही. या खात्याच्या मंत्र्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांना खात्याचे काम करण्यात स्वारस्य नाही. गेल्या दीड वर्षापासून राज्यातील आरोग्य केंद्राचा औषधपुरवठा बंद आहे. औषधपुरवठा करण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाकडे आहे. या खात्याने दीड वर्षापासून याची निविदा निश्चित केली नाही. त्यामुळे सर्व राज्यांत औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याची टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी घोडेगाव येथे आयोजित कार्यक्रमात केली.
घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या रक्तसाठवणूक केंद्राचे उद्घाटन वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तसाठवणुकीसाठी शरद सहकारी बँकेने दोन लाख रुपयांचे मशिन व युनिट उपलब्ध करून दिले आहे.
यावेळी शरद बँकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, संचालक दिलीप काळे, सोमनाथ काळे, दत्ताशेठ थोरात, कैलास काळे, सखाराम घोडेकर, घोडेगाव सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार उपस्थित होते. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. गीता कुलकर्णी यांनी आभार मानले.