FC रस्त्यावरील ‘एल-३’ बारमधील अमली पदार्थ सेवन प्रकरण; ७ आरोपींना २९ जूनपर्यंत कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 09:58 AM2024-06-25T09:58:15+5:302024-06-25T09:58:37+5:30
अल्पवयीन मुलांनाही अमली पदार्थ दिल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी (दि. २४) न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयाने अटकेतील आरोपींना २९ जूनपर्यंत कोठडी सुनावली.....
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्विड लेझर लाउंज (एल ३) मध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणात अटकेतील सात जणांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पार्टीसाठी आलेल्यांना अमली पदार्थासारखा पदार्थ देण्यात आला होता. कारवाई केल्यानंतर तिघांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आला नाही. अहवाल आल्यानंतर इतरांचीदेखील चौकशी होणार असून, त्यानुसार गुन्ह्यात कलमवाढ केली जाईल. अल्पवयीन मुलांनाही अमली पदार्थ दिल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी (दि. २४) न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयाने अटकेतील आरोपींना २९ जूनपर्यंत कोठडी सुनावली.
बारच्या जागेचे मालक संतोष कामठे (रा. ४४७/४, रंजनीगंध अपार्टमेंट शिवाजीनगर), बार चालविण्यासाठी घेतलेले उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. फ्लॅट नं. ३०२, साईप्रसार अपार्टमेंट, लेन नं. १० मुंजाबा वस्ती, धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. दवन सोसायटी, श्रीराम स्वीट मार्ट, भूगाव), रवी माहेश्वरी (रा. एच १००६, ३८२ पार्क, मॅजिस्ट्रीक, उंड्री), पार्टीचे आयोजन केलेला अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), डीजे दिनेश मानकर (रा. नाना पेठ), तर आयोजनात सहभागी झालेले रोहन गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर) आणि मानस मल्लिक (वय ३३, रा. फ्लॅट नं. ४२, जयजवाननगर, राम मंदिराजवळ, येरवडा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचाही छापा; सहा जणांना अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ‘एल-३’वर छापा टाकला. यात सव्वातीन लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला; तसेच सहा वेटरना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले. या सहा आरोपींनाही न्यायालयाने २९ जूनपर्यंत उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मोहित शर्मा (वय २९, मूळ रा. सेमरा रोवा, मध्य प्रदेश), अमीर असफ अली हुसैन (वय २७, मूळ रा. नागाव, आसाम), सौरव शेखर बिसवास (वय २५, मूळ रा. २४ परगणा, पश्चिम बंगाल), खैरूल इस्लाम समसुलहक (वय २२, मूळ रा. होजाई, आसाम), कोहिमुद्दीन इलाम शेख (वय ३०, मूळ रा. नाडिया, पश्चिम बंगाल) आणि नरूल इस्लाम ताहिरुद्दीन (वय २२, मूळ रा. नागाव, आसाम, सर्व सध्या रा. शिवाजीनगर), अशी कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहेत.