सरपंचासह १३ जणांवर दरोड्याचा गुन्हा
By admin | Published: November 27, 2015 01:38 AM2015-11-27T01:38:40+5:302015-11-27T01:38:40+5:30
नारायणगाव येथील शंकर जाधव यांचा गाळा ताब्यात घेण्याच्या प्रकरणात नारायणगाव पोलिसांनी अखेर ग्रामपंचायतीचे सरपंचांसह ग्रामसेवक व कर्मचारी
नारायणगाव : नारायणगाव येथील शंकर जाधव यांचा गाळा ताब्यात घेण्याच्या प्रकरणात नारायणगाव पोलिसांनी अखेर ग्रामपंचायतीचे सरपंचांसह ग्रामसेवक व कर्मचारी अशा १३ जणांवर भा़ द़ विधान कलम ३९५ अन्वये दरोड्याचा गुन्हा बुधवारी रात्री उशिरा दाखल केला आहे.
सुधारित रिव्हिजनची कॉपी जुन्नर न्यायालयात दाखल करून, आरोपींना पुन्हा अटक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने केली आहे़, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी दिली़
या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल होणार, असे वृत्त प्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़ नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री मेहेत्रे, ग्रामसेवक राजेंद्र खराडे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी मच्छिंद्र जगताप, दिनेश वाव्हळ, मंदार देशपांडे, प्रवीण जगताप, हनुमान लोखंडे, विजय माने, दीपक कदम, गोपी खंडे, दीपक जोशी, ज्ञानेश्वर माने, संतोष कोल्हे यांच्यासह राजेंद्र हाडवळे, ग्रा़ पं़ सदस्य अमित राजेंद्र कोऱ्हाळे, शांताराम बरडे, अतुल किसन डेरे, स्वप्नील किसन डेरे, गौरव दिलीप पाटे, अनिकेत अविनाश कोऱ्हाळे, दिनेश दादाभाऊ शिंंदे, साईनाथ घोलप, नंदू अडसरे, दत्तोबा तरडे, विनायक जाधव, सागर डेरे, रूपेश विलास खैरे, अक्षय खोकराळे, प्रणव पाटे, कृष्णा डेरे, चंद्रकांत अडसरे आदींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी शंकर जाधव यांचा फेरपुरवणी जबाब २१ नोव्हेंबर रोजी घेतला होता. यावरून दरोड्याचे कलम लागणार, हे जवळपास निश्चित झाले होते. पोलिसांनी जुन्नर पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, नारायणगाव ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्याकडे पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतीला ही कारवाई करण्याचे अधिकार आहेत किंवा नाही, याची माहिती मागितल्याने दरोड्याचे कलम वाढविण्यास विलंब झाला होता़
यापूर्वी नारायणगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि़ नं़ १३०/२०१५ भा़ द़ वि़ कलम ४५२, ४४८, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे ग्रामपंचायत व बाहेरील गुंडाविरूद्घ १८ आरोपींविरूद्घ गुन्हा नोंद केला होता़ आता यापूर्वीच्या १८ जण व सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी आदी १३ जणांवर नव्याने गुन्हा दाखल केला आहे़ या गुन्ह्यात आरोपींची संख्या ३१ झाली आहे़ (वार्ताहर)
ग्रामपंचायतीचीही पोलिसांकडे तक्रार
ग्रामपंचायतीने नारायणगाव पोलीस ठाण्यास पत्र दिले असून, या पत्रात सदरची जागा ही ग्रामपंचायत मालकीची असून ती गोडाऊन म्हणून वापरात आहे़ १६ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीने गाळ्यावर केलेल्या कारवाईचा राग मनात धरून त्याच दिवशी ११.१५ वाजता बाळू लक्ष्मण जाधव यांचेसह दिलीप खैरे, प्रशांत खैरे, योगेश पाटे, मंदार पाटे, कपिल कानसकर, आकाश कानसकर, संतोष दांगट, नीलेश गांधी, अशोक रत्नपारखी, आरीफ आतार, संदीप मुळे, नामदेव खैरे, सागर भोर, दिनेश बारणे, शिवाजी कोल्हे, वैभव बारहाते, अनिकेत धावडे, आकाश वऱ्हाडी, अझर शेख, प्रफुल्ल सुराणा, अभिजीत शेटे आदींनी ग्रामपंचायत मालकीच्या गोडाऊनची तोडफोड करून सुमारे ४७ हजार रुपयांचे, गाळ्यातील साहित्य लंपास केले़, अशी लेखी तक्रार सरपंच जयश्री मेहेत्रे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यास केली आहे़