ड्रगमाफियांविरुद्ध मोक्का
By admin | Published: April 1, 2017 02:37 AM2017-04-01T02:37:13+5:302017-04-01T02:37:13+5:30
अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या माफियांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये कारवाई
पुणे : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या माफियांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, शहरातील ही पहिलीच कारवाई असून राज्यातील दुसरी कारवाई असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिली.
अलीशेर लालमहंमद सौदागर (वय ५३), अशोक राजाराम भांबुरे (वय ३३) आणि नीरज अर्जुन टेकाळे (वय २४, तिघे रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी, शिवाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिघांविरुद्ध अमली पदार्थांचा साठा, विक्री करणे तसेच अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांत तीन वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद आणि अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले. (प्रतिनिधी)
लँडमाफिया, धान्याचा काळाबाजार करणारे आणि खंडणीखोरांविरुद्ध मोक्काची जोरात कारवाई सुरु आहे. शहरातील अमली पदार्थांची तस्करी वाढली असल्याचे दिसून येत आहे. तरुणांना यापासून परावृत्त करण्यासाठी तसेच तस्करी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी ड्रगमाफियांविरुद्ध मोहीम उघडली आहे. नागरिकांनी याची माहिती पुढे येऊन द्यावी. पोलिसांकडून कारवाई केली जाईल.
- सुनील रामानंद, सह पोलीस आयुक्त