Pune FC Road Drugs Party: पुण्यात पोलिसांच्या नाकावर टिच्चून ड्रग्स पार्टी? त्या पार्टीची A To Z स्टोरी....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 06:51 PM2024-06-25T18:51:39+5:302024-06-25T18:52:56+5:30
फर्ग्युसन रस्त्यावरील या पार्टीमुळे रात्रपाळीवर असणाऱ्या ४ पोलिसांचं निलंबन, तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या २ कर्मचाऱ्यांना तात्काळ सस्पेंड
किरण शिंदे
Pune FC Road Drugs Party: पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावरील एल थ्री अर्थात लिक्विड लेजर लाऊंज या हॉटेलमधील ड्रग्स पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि खळबळ उडाली.. 40 जणांचा एक ग्रुप या हॉटेलमध्ये येतो आणि नियमांचे बंधन झुगारून तल्लीन होतो. डिस्कोच्या तालावर रात्रभर थिरकतो. यातलेच काही तरुण ड्रग्सचं सेवन करतात. आणि तरुणांच्या या बेफामपणाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. या ड्रग्स पार्टीचा मास्टरमाईंड आहे अक्षय कामठे. इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या याच अक्षयने शनिवारी दोन पार्ट्यांचं आयोजन केलं होतं. 40 जणांचा, तरुण-तरुणींचा ग्रुप या पार्ट्यांसाठी सज्ज होता.
दीड वाजता खरी पार्टी सुरू
पहिली पार्टी झाली ती हडपसर मधील द कल्ट या पबमध्ये. शनिवारी रात्री बारापर्यंत हा ग्रुप याच कल्ट हॉटेलमध्ये होता. आणि रात्रीचे बारा वाजताच यातील एक एक करत सर्वजण बाहेर पडले. कारण रात्री दीड वाजता खरी पार्टी सुरू होणार होती. याची संपूर्ण व्यवस्था इव्हेंट मॅनेजर असलेल्या अक्षय कामठेने आधीच करून ठेवली होती. कल्ट हॉटेल मधून बाहेर पडलेला हा ग्रुप हळूहळू फर्ग्युसन रस्त्यावर आला. तेथीलच एका गल्लीत त्यांनी आपल्या गाड्या पार्क केल्या. आणि हे सर्व तरुण दीड वाजण्याची वाट पाहत होते. खरंतर रात्री दीड वाजण्याची वेळ ही शहर सामसूम होण्याची वेळ. आणि तशी तयारीही सुरू होती. मात्र याच रस्त्यावरील एल थ्री अर्थात लिक्विड लेजर लाउंज या पबमध्ये काहीतरी वेगळीच हालचाल सुरू होती. वेळ संपल्याचं कारण देत आधी जमलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आलं. १च्या सुमारास पोलीस आले. पब बंद झाल्याचं त्यांनीही पाहिलं. आणि ते निघून गेले. आणि त्यानंतर सुरू झाला खरा खेळ.
पोलीस यंत्रणा खडबडून जागी
लिक्विड लेजर लाउंजचा पुढचा दरवाजा बंद झाला आणि मागचा दरवाजा उघडला गेला. द कल्ट हॉटेलमधून आधीच पार्टी करून आलेली पोरं हळूहळू मागच्या दाराने आत घुसली. आणि सुरू झाला एक वेगळीच पार्टी. ही पार्टी होती अमली पदार्थाची. कारण याच पार्टीतील दोन मुलं अमली पदार्थ घेताना कॅमेऱ्यात कैद झालेत. तर बेधुंद अवस्थेत डिस्को म्युझिकच्या तालावर काही तरुण तरुणी थिरकत असल्याचा दुसरा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. पहाटे ५ पर्यंत ही पार्टी सुरू होती. मात्र या पार्टीची कुणकुण अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांना काही लागलीच नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा या पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा मात्र पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण
रविवारी दुपारी गुन्हे शाखेचे पोलीस या हॉटेलवर धडकले. कारवाईला सुरुवात झाली. पार्टीत सहभागी होणाऱ्या तरुणांची धरपकड सुरू झाली. वेटर, ऑर्गनायझर, हॉटेल मालक अशा ९ ते १० जणांवर गुन्हे दाखल केले. यातील नऊ जणांना अटकही केली. हॉटेल सील करण्यात. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारीही हॉटेलवर येऊन धडकले. त्यांनीही कारवाई करत मद्याचा साठा जप्त केला. मात्र प्रश्न इथच संपले नाहीत. लेट नाईट पार्टीसाठी बंदी असताना पार्टी झालीच कशी? पोलिसांचा वचक उरला नाही का? नाईट ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना हा धांगडधिंगा दिसला नाही का? पार्टीत ड्रग्स कुठून आलं? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले.आणि त्यानंतर पोलीसही जागे झाले.
ड्रग्सचं सेवन करणाऱ्या २ तरुणांना अटक
त्यादिवशी रात्रपाळीवर असणाऱ्या चार पोलिसांचं निलंबन करण्यात आलं. यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनाही तात्काळ सस्पेंड करण्यात आलं. वायरल व्हिडिओत ड्रग्सचं सेवन करणाऱ्या २ तरुणांना ही अटक करण्यात आली. यातला एक होता मुंबईचा तर दुसरा पुण्याचा. इतकच नाही तर महापालिकेने या हॉटेलवर हातोडा चालवला.
पोलिसांची कारवाई होती थोतांड
खर तर ललित पाटील प्रकरणामुळे शहरातील ड्रग्सचं जाळं आणि पोर्शे कार अपघातानंतर शहरातील फोफावलेली पब संस्कृती उघडी पडली. याचे दुष्परिणाम ही समोर आले. पोलिसांनी या दोन्ही वेळेस कारवाई सुद्धा केली. मात्र ही कारवाई किती थोतांड होती हे फर्ग्युसन रस्त्यावरील या ड्रग्स पार्टीने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.