औषध दुकाने २४ तास खुली
By admin | Published: May 30, 2017 03:24 AM2017-05-30T03:24:07+5:302017-05-30T03:24:07+5:30
आॅनलाइन फार्मसी आणि ई-पोर्टलच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या वेळी रुग्णांचे औषधांअभावी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आॅनलाइन फार्मसी आणि ई-पोर्टलच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या वेळी रुग्णांचे औषधांअभावी हाल होऊ नयेत, यासाठी तातडीच्या सेवेची सोय करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे खासगी रुग्णालयांमधील २४ मेडिकल स्टोअर सुरु ठेवण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे सात हजार औषध दुकाने आज बंद राहणार आहेत. रुग्णांचे हाल होऊ देणार नसल्याची भूमिका घेत पुणे जिल्हा औषध विक्रेता संघटनेने काही हेल्पलाईन क्रमांकांची यादी अन्न आणि औषध प्रशासनाकडे सुपूर्त केली. त्याच वेळी एफडीएतर्फे शहरासह जिल्ह्यातील विविध
खासगी रुग्णालयांमधील औषध दुकाने खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त ए. एम. खडतरे यांनी दिली.
पुणे शहरातील भारती हॉस्पिटल, पूना, दीनानाथ मंगेशकर, सह्याद्री, कोलंबिया एशिया, रत्ना मेमोरियल, इनामदार, नोबेल, जहांगीर, रुबी, जोशी, मेडप्लस, अपोलो, केईएम, इनलॅक्स बुधराणी, देवयानी हॉस्पिटल, एमजेएम हॉस्पिटल अशा सुमारे शंभर हॉस्पिटलमध्ये औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत.
ही औषध दुकाने २४ तास सुरु राहणार आहेत. या ठिकाणी पेशंटना औषधे उपलब्ध होणार आहे. औषधांसाठी नागरिकांनी एफडीएशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुुक्त सुहास मोहिते यांनी केले.