Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटीलजवळील 'ते' सहा मोबाइल काेणाच्या खिशात? सीसीटीव्हीचे गुपित उलगडेना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 02:40 PM2024-08-20T14:40:32+5:302024-08-20T14:41:06+5:30
ललित पाटीलकडून दोन मोबाइल जप्त केल्याची नोंद पोलिसांकडे असेल, तर ‘ससून’मधील कर्मचाऱ्यांनी पाहिलेले ते ६ मोबाइल काेणाच्या खिशात गेले
दुर्गेश मोरे
पुणे : ललित पाटील प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मात्र, तपासादरम्यान, ललित पाटील याने मुंबई पोलिसांना आपल्याला पळून जाण्यास सांगितले होते, असा खुलासा केला होता, त्या अनुषंगाने छोट्याछोट्या गोष्टींचा तपास होणे गरजेचे असल्याची चर्चा पुण्यात सुरू झाली आहे. ललित पाटीलकडून दोन मोबाइल जप्त केल्याची नोंद पोलिसांकडे असेल, तर ‘ससून’मधील कर्मचाऱ्यांनी पाहिलेले ते ६ मोबाइल काेणाच्या खिशात गेले, या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच आहे.
जून २०२३ पासून ललित पाटील ससून रुग्णालयातील वॉर्ड क्र. १६ मध्ये उपचार घेत होता. या वॉर्डमध्ये ललितच नाही तर अनिल भोसले, प्रदीप शर्मा असे सहा-सात व्हीआयपी लोक होते. कोर्ट कंपनी नियमानुसार प्रत्येक आरोपीसाठी स्वतंत्र गार्डची नेमणूक करण्यात येते. ललितसाठी एक पोलिस उपनिरीक्षक आणि चार कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
ललित पाटील पळून गेल्यानंतर कर्तव्यात कसून करणाऱ्या त्याच्याशी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले; पण त्या वॉर्डमध्ये अन्य काही व्हीआयपी लोकांना तत्पूर्वीच हलवले होते. त्यांच्याकडे चाैकशी केली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ललितकडून दोन मोबाइल जप्त केल्याची पोलिसांकडे नोंद आहे.
वास्तविक, रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या मते ललितकडे सहा मोबाइल होते. जर सहा मोबाइल असतील तर ते कोणाच्या खिशात गेले, त्या अनुषंगाने तपास झाला किंवा नाही, तसेच ते मोबाइल कोणाचे होते, ते कुणी पुरविले, त्यामधील सीम कोणाच्या नावाने होते, त्यावरून तो कोणाशी संपर्क साधत होता, तसेच त्या वॉर्डमध्ये असणाऱ्या अन्य लोकांकडे मोबाइल होते का, त्यावरून ललितने कोणाला फोन केले का, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.
ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही वळवण्यात आले होते. ते कोणी वळवले हे आजपर्यंत समोर आले नाही. ते कधी वळवले होते. हेही माहीत नाही. सीसीटीव्ही वळवणारी व्यक्ती निश्चितच त्यामध्ये आली असणार तिचाही शोध लागलेला नाही. सीसीटीव्ही बंद करून वळवले असतील तर त्या चित्रण संपादित केल्या जाणाऱ्या ठिकाणी कोणाची ड्यूटी होती, हेही पाहणे गरजेचे आहे. ललित पाटील पळून जाणार त्याचवेळी विद्युत पुरवठा बंद होणे हा निव्वळ योगायोग आहे की अन्य काय, हे देखील स्पष्ट झाले नाही. एकूणच जे प्रश्न निर्माण झाले त्याची उत्तरे सापडत नसल्याने हे प्रकरण दिसते तसे नसल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
आता उपचाराची गरज नाही का ?
पिंपरी-चिंचवड येथे २०२० मध्ये पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात त्याचा मुक्काम होता. त्यानंतर जून २०२३ मध्ये टीबी, हर्निया अन्य आजारावर उपचार करण्यासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २ ऑक्टोबर २०२३ ला ललितला पळायला लावले अथवा पळून गेला, त्यानंतर त्याला १८ ऑक्टोबरला बंगळुरू येथे मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी अटक केली आणि ३१ ऑक्टोबरला पुणे पोलिसांनी ललितचा ताबा घेतला. त्यानंतर आज अखेरपर्यंत ललितला असणाऱ्या आजारावर उपचार करण्याची गरज भासली नाही. म्हणजे उपचाराचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरवर काय कारवाई झाली. तो सल्ला देण्यामागे पडद्याआडचा सूत्रधार कोण या प्रश्नाचे उत्तरही गुलदस्त्यातच आहे.